आचार्य अत्रे नाट्यगृह कल्याण येथील माल वाहतूक लिफ्ट काम दोन महिन्यात पूर्ण होणार उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे घेतलेल्या बैठकीत आयुक्तांनी घेतला निर्णय.... - ना.डॉ.गोऱ्हे यांच्या बैठकीचे फलित
पुणे,दि.२९/१०/२०२० - कोव्हिडं-१९ ची लाट ओसरल्यानंतर नाट्यगृहाच्या कामांना चालना देण्याच्या पूर्वीच नाट्यगृहाची कामे पूर्ण करण्या संदर्भात महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित केली. दि.१९ ऑक्टोबर २०२० रोजी घेण्यात आलेल्या राज्यातील नाट्यगृह दुरुस्ती संदर्भातील बैठकीमध्ये ज्येष्ठ नाट्य व चित्रपट कलाकार सुबोध भावे यांनी कल्याण येथील नाट्यगृहांमध्ये असुविधेबाबत लक्ष वेधले होते. त्या अनुषंगाने आज दुरदृश्य प्रणालीद्वारे आदेश बांदेकर,सुबोध भावे,महेश पाठक - प्रधान सचिन नगर विकास,श्री मिसाळ - विभागीय आयुक्त कोकण,डॉ विजय सूर्यवंशी-आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्यासोबत बैठक घेण्यात आली.

यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथील आचार्य अत्रे नाट्यगृहात नाटकाचे साहित्य घेऊन जाण्यासाठी लिफ्टची व्यवस्था नसल्या बाबत अभिनेता सुबोध भावे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत लिफ्ट लवकर बसविण्याबाबत ना.डॉ.गोऱ्हे यांनी सूचना दिली.यावर आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी दोन महिन्यात लिफ्टचे काम पूर्ण करू असे सांगितले. सर्व नाट्यगृहांमध्ये आवश्यक असणाऱ्या सुविधा याची यादी करण्यात आलेली असून ती यादी सांस्कृतिक विभागाने तात्काळ सर्व महानगरपालिकेना पाठवाव्यात तसेच कल्याण येथील आचार्य अत्रे नाट्यगृहामध्ये लिफ्ट पारदर्शक असावी म्हणजे होणारे गैरप्रकार थांबतील व सुरक्षिततेच्या दृष्टीनेही हे आवश्यक बाब असल्याचे सांगितले त्यानुसार लिफ्ट पारदर्शी करावी. तसेच नाट्यगृहांमध्ये कार्यरत असणारे महानगरपालिकेचे कर्मचारी यांना आवश्यक असणारे ट्रेनिंग देण्यात यावे आणि ज्या ठिकाणी यापूर्वीच कलाकारांना राहण्याची सुविधा उपलब्ध आहे तिथे स्वच्छता व आवश्यक सुविधा योग्य प्रकारे असल्याबाबतची खात्री महानगरपालिका आयुक्त यांनी करावी असेही निर्देश ना.डॉ.गोऱ्हे यांनी दिले. प्रत्येक महानगरपालिकेमध्ये पदाधिकारी व अधिकारी यांची या नाट्यगृहांमध्ये आवश्यक असणाऱ्या सुविधाच्या अनुषंगाने एक व्यवस्थापन समिती स्थापन करावी असेही डॉ गोऱ्हे यांनी सूचना केली.

त्याचबरोबर ना.डॉ.गोऱ्हे यावेळी म्हणाल्या की, सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यातील नाटयगृहांचे प्रश्न/समस्या सोडविण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाने राज्यातील नाटयगृहांचे प्रश्न सोडविताना प्राधान्य क्रम ठरवून ते प्रश्न मार्गी लावावेत.नियुक्त करण्यात आलेल्या पथकाची माहिती विधानसभा उपसभापती यांच्यासह महानगरपालिका आयुक्तांनाही द्यावी.या पथकाने प्रत्येक नाटय गृहांची पाहणी करुन प्राधान्याने तेथील समस्या सोडविण्यावर भर द्यावा.

यावेळी सुबोध भावे यांनी डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृह बंद असून त्यामधील सर्व दुरुस्ती करून घ्यावी असे विचार मांडले.

आदेश बांदेकर - अध्यक्ष सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट मुंबई व जेष्ठ नाट्य व चित्रपट कलाकार निर्माते दिग्दर्शक यांनी अनेक वेळा नाटकाचे प्रयोग संपल्यानंतर किंवा नाटकाच्या तालमी उशिरा संपल्यानंतर कलाकार व सर्व कर्मचाऱ्यांना निवासाची सोय आवश्यक असते ती सोय अनेक ठिकाणी आहे फक्त ती योग्य प्रकारे करावी. त्याबरोबर मॅनेजर यांनीही या सुविधांकडे लक्ष ठेवावे असे सांगितले.
 
    डॉ.विजय सूर्यवंशी आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांनी लिफ्टसाठी आवश्यक असणारा खर्च मंजूर करण्यात आलेला असून हे काम दोन महिन्यात पूर्ण करण्यात येईल असे सांगितले.तसेच डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृहामध्ये नुकताच अडीच कोटी रुपये खर्च करून आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. तथापि या सुविधांमध्ये आणखीन आवश्यक असणाऱ्या गोष्टी अभिप्रेत असतील तर त्यासाठी कलाकारांच्याबरोबर एक संयुक्त भेट देऊन त्या सुविधा पूर्तता करण्यात येईल असे सांगितले.

     नगरविकास सचिव महेश पाठक यांनी सर्व नाट्यमंदिरात तपशीलवार सुचना देण्यात येऊन समित्या करण्यासाठी राज्यस्तरीय आढावा घेण्यात येईल सांगितले.

  विभागीय आयुक्त श्री.मिसाळ यांनी कोकणातील नाट्यमंदिरांतील सुविधांचा आढावा घेण्याची ग्वाही दिली.

   कल्याण डोंबिवलीचे आयुक्त विजय सुर्यवंशी यांनी तेथील नाट्यमंदिरांचा आढावा घेण्यास येण्याची विनंती केली असता ना.नीलमताई गोर्हे यांनी आदेश बांदेकर व सुबोध भावे यांच्यासह उपसभापती कार्यालयातील दोन अधिकारी यांनीही त्यांच्यासोबत जाऊन सुधारणा व प्रगती चा आढावा घेण्यास निर्देश दिले.

    ही बैठक आयोजित केल्याबद्दल अभिनेते व निर्माता आदेश बांदेकर,सुबोध भावे यांनी ना.डॉ. गोऱ्हे व शासकीय अधिकाऱ्यांचे नाट्य-कलावंत यांच्यावतीने आभार मानले.
 
Top