शासन मान्यतेनंतर सुधारित दरानुसार मास्क विक्री करणे बंधनकारक

    मुंबई ,०८/१०/२०२० - आता एन-९५ N95 masks मास्क त्याच्या प्रकारानुसार साधारण १९ ते ५० रुपयां पर्यंत उपलब्ध होईल तर दुहेरी आणि तिहेरी पदरांचे मास्क masks अवघ्या तीन ते चार रुपयांना मिळतील. समितीने निर्धारित केलेल्या किमतींवर निर्णय घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून शासन मान्यतेनंतर सुधारित दरानुसार मास्क विक्री करणे बंधनकारक असणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे .

आता सामान्यांना परवडणाऱ्या किंमतीत मास्क उपलब्ध होणार

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क,सॅनिटायझरच्या किमतींवर नियंत्रण आणण्याकरिता नेमलेल्या समितीच्या शिफारशी नुसार आता सामान्यांना परवडणाऱ्या किंमतीत मास्क उपलब्ध होणार असून असा निर्णय घेणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे.मास्कचे दर नियंत्रित असावेत यासाठी आरोग्यमंत्री टोपे आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये राज्य आरोग्य सेवा हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली होती.

   राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले,कोरोना साथीच्या आधी एन ९५ मास्क ४० रुपयांना विकला जायचा. मार्चमध्ये हाच मास्क ४० वरून १७५ रुपये एवढ्या चढ्या दराने विकला गेला.काही एन ९५ मास्कची तर २५० रुपयांपर्यंत विक्री झाली. तिहेरी आणि दुहेरी पदर असलेले मास्क ८ ते १० रुपयांवरून १६ रुपयांना विक्री झाली असून त्यांच्या किमतींत १६० टक्क्यां पेक्षा जास्त वाढ झाल्याचे समितीच्या निदर्शनास आले . कच्चा माल,उत्पादन किंमत, उत्पादक, वितरक यांचा नफा या सर्व बाबींचा अभ्यास करून समितीने किमती निश्चित केल्या आहेत.

त्यामुळे रुग्णालयांचा रुग्ण सेवा खर्चदेखील कमी होईल

मास्क किफायतशीर किमतींत उपलब्ध झाल्यावर सामान्यांना दिलासा मिळणार असून योग्य निकषा नुसार त्याचे उत्पादन देखील होईल आणि योग्य दरात त्यांचा पुरवठाही होईल. रुग्णालयांचा रुग्ण सेवा खर्चदेखील त्यामुळे कमी होईल,असा दावा त्यांनी केला.
 
Top