आरोग्य मंत्रालयाच्या ई-संजीवनी दूरवैद्यकीय उपक्रमाचा ५ लाख जणांना लाभ 

नवी दिल्ली,PIB Mumbai,१२ऑक्टोबर २०२० -आरोग्य मंत्रालयाच्यावतीने सुरू करण्यात आलेला ई-संजीवनी दूरवैद्यकीय सेवा-उपक्रम,e sanjeevani durvaidyakiy upkram रूग्ण आणि डॉक्टरांमध्ये आता अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. अतिशय कमी कालावधीमध्ये या सेवेचा लाभ आत्तापर्यंत सुमारे पाच लाख जणांनी घेतला आहे. दूरध्वनीव्दारे रूग्णांना या उपक्रमामध्ये सहभागी होवून आपल्या आरोग्य विषयक समस्येवर मार्गदर्शन घेता येते. गेल्या १७ दिवसांमध्ये एक लाख लोकांनी दूरध्वनीच्या माध्यमाने ही सेवा घेतली आहे.

आरोग्य सेवांचे डिजिटल वितरण करण्यासाठी रूपरेषा म्हणून ई-संजीवनी आता हळूहळू भारतीय आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने रूळत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ई-संजीवनी मार्फत आरोग्य विषयक प्रश्नांवर मार्गदर्शन घेण्यासाठी दररोज येणाऱ्या दूरध्वनींची संख्या ८००० पर्यंत पोहोचली आहे. सध्या ई-संजीवनी हा उपक्रम २६ राज्यांमध्ये दोन प्रकारांनी सुरू आहे. यामध्ये डॉक्टर ते डॉक्टर (ई-संजीवनी एबी-एचडब्ल्यूसी) आणि रूग्ण ते डॉक्टर (ई-संजीवनी ओपीडी) यांचा समावेश आहे.

डॉक्टर ते डॉक्टर (ई-संजीवनी एबी-एचडब्ल्यूसी) उपक्रमाला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्र्यांनी नोव्हेंबर २०१९ मध्येच प्रारंभ केला होता. यामध्ये १,५५,००० आरोग्य आणि कल्याण केंद्रांना समाविष्ट करून घेण्यात आले होते. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या रूग्णालयां मध्ये हा उपक्रम राबविण्यात येत होता. या अंतर्गत आयुष्मान भारत योजनेचेही काम करण्यात येत होते.

 ई-संजीवनी ओपीडी अतिशय लाभदायक

   या उपक्रमाचा महत्वाकांक्षी दुसरा प्रकार रूग्ण ते डॉक्टर (ई-संजीवनी ओपीडी) सुरू करण्यात आला. संपूर्ण देशामध्ये कोविड-19 महामारीचा उद्रेक झाल्यानंतर टाळेबंदीच्या काळामध्ये देश भरातल्या ओपीडी बंद करण्यात आल्या. अशावेळी रूग्णांना ई-संजीवनी ओपीडी अतिशय लाभदायक ठरली. हा उपक्रम रूग्ण आणि डॉक्टर अशा दोघांच्याही सुविधेचा ठरला. या उपक्रमामध्ये १०० पेक्षा जास्त वैद्यकीय व्यवसायिक १००० पेक्षा जास्त रूग्णांना दूरध्वनीच्या माध्यमातून त्यांना असलेल्या आरोग्यविषयक समस्यांवर उपाय सांगतात. तसेच औषधोपचारांची माहिती दिली जाते. यापैकी अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी १०,००० पेक्षा जास्त रुग्णांना दूरध्वनीवरून आरोग्यविषयक मार्गदर्शन केले आहे. तसेच एकापेक्षा अधिक वेळा ई-संजीवनी सेवा वापरून वैद्यकीय सल्ला घेणाऱ्या रूग्णांचे प्रमाण २० टक्के आहे.

    ई-संजीवनी आणि ई-संजीवनी ओपीडी या मंचाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या ७८९५ जणांनी वैद्यकीय सेवा घेतली आहे.
 
Top