स्थानिक गुन्हे शाखा,सोलापूर ग्रामीणची कामगिरी   पंढरपूर,(दिनेश खंडेलवाल),२२/१०/२०२०- मंगळवेढा पोलीस ठाणेच्या हद्दीतील घरफोडी चोरी व सोलापूर तालुका पोलीस ठाणेच्या हद्दी तील मोटार सायकल चोरी अशा २ गुन्हयाची उकल झाली असून १ आरोपीस जेरबंद करण्यात आले आहे .४ मोबाईल हॅन्डसेट १ स्प्लेडर प्लस मोटार सायकल असा एकूण ६९ हजार५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अब्दुल बालमसाहेब इनामदार ,वय ७८,धंदा शेती रा.जगदाळे गल्ली, मंगळवेढा हे दिनांक १४/०८ /२०२० रोजी घराचा दरवाजा बंद करून झोपले असताना अज्ञात चोरटयाने त्याचे घरात प्रवेश करून त्याचे कपाटातील सोन्याचे बदाम,अंगठी, रोख रक्कम,नोकीया व रेडमी कंपनीचे मोबाईल हॅन्डसेट असा एकूण २९ हजार ८०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला म्हणुन मंगळवेढा पोलीस ठाणेस गुरनं 437/2020 भादंवि कलम 457,380 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

सदर गुन्हयाची उकल होण्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक हे दि २०/१०/ २०२० रोजी मंगळवेढा पोलीस ठाणेच्या हद्दीतील पाटखळ गावात असताना त्यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराकरवी बातमी मिळाली की,सदरचा गुन्हा हा संशयित इसम सतीश पपल्या शिंदे रा.खडकी ,ता.मंगळवेढा यांने त्याचे साथीदारासह केला असून तो व त्याचा साथीदार असे नंबर नसलेल्या मोटार सायकलीवरून खडकी गावा कडुन पाटखळ गावाकडे येत आहेत.

मिळालेल्या बातमीनुसार स्थानिक गुन्हा शाखे कडील पथक पाटखळ गावचे पुढे येऊन रोडवर थांबले असता खडकीच्या दिशेकडुन एका दुचाकी मोटार सायकलीवरून २ इसम येताना दिसले. त्या इसमाचा संशय आल्याने स्थागुशा कडील कर्मचारी यांनी त्यास थांबण्याचा इशारा केला परंतु ते न थांबता तसेच पुढे जाऊ लागले तेव्हा पथकातील कर्मचार्यांनी त्यांचा पाठलाग करून त्यास पकडले तेव्हा दुचाकी मोटार सायकलीवर पाठीमागे बसलेला दुसरा इसम हा पोलीसांची नजर चुकवून पळुन गेला. ताब्यात घेतलेल्या इसमास त्याचे नाव गाव पत्ता विचारता त्यांनी त्याचे नाव सतीश पपल्या शिंदे,वय २४ रा.खडकी ता.मंगळवेढा असे सांगितले. पळुन गेलेल्या इसमाचे नाव पत्ता त्याने सचिन सुब्रराव उर्फ बाळु शिंदे,रा.खडकी तांडा, ता.मंगळवेढा असे असल्याचे सांगितले.

ताब्यात घेतलेल्या इसमाची अंगझडती घेतली असता त्याचे शर्टाचेवरील खिशामध्ये एक काळया रंगाचा नोकीया कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट मिळुन आला. मिळुन आलेल्या मोबाईल हॅन्डसेटबाबत त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारपूस करता त्याने व त्याचा साथीदार सचिन सुब्रराव उर्फ बाळु शिंदे ,रा.खडकी ताडा ता.मंगळवेढा याचेसह मागील २ महिन्यापुर्वी मंगळवेढा येथुन चोरी केली असल्याचे सांगितले. त्याचे जवळ असलेल्या दुचाकी मोटार सायकलीस पांढरी रंगाची पिशवी दिसुन आली. ती पिशवी तपासुन पाहिली असता त्यामध्ये आयफोन, जिओ व विवो कंपनीचे 3 मोबाईल हॅन्डसेट मिळुन आले. मिळुन आलेल्या मोबाईल हॅन्डसेट बाबत त्याचेकडे विचारपूस करता त्याने सदरचे मोबाईल हे त्याचा साथीदार सचिन शिंदे याचेसह मंगळवेढा व सोलापूर भागातुन चोरले असल्याचे सांगितले आहे. त्याचे ताब्यात असलेल्या दुचाकी मोटार सायकली बाबत त्याचेकडे विचारपूस करता त्यांने ती मागील 2 वर्षापुर्वी सोलापूर-हैद्राबाद रोड वरून चोरून आणली असल्याचे सांगितले. सदर बाबत सोलापूर तालुका पोलीस ठाणेस मोटार सायकल चोरीचा गुन्हा दाखल आहे.

इसम नामे सतीश पपल्या शिंदे (वय 24 रा.खडकी ता.मंगळवेढा) याचे ताब्यातुन घरफोडी चोरीच्या गुन्हयातील नोकीया कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट व इतर चोरीच्या गुन्हयातील असे ३९ हजार ५०० रूपये किंमतीचे आयफोन,विवो व जिओ कंपनीचे असे एकूण ४ मोबाईल हॅन्डसेट व ३० हजार रूपये किंमतीची चोरीची स्प्लेडर प्लस दुचाकी मोटार सायकल असा एकूण ६९ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यास पुढील तपासकामी मंगळवेढा पोलीस ठाणेच्या ताब्यात दिले आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते,अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलीस निरीक्षक अरूण सावंत यांचे नेतृत्वाखाली पोहवा/सर्जेराव बोबडे, विजयकुमार भरले, मोहन मनसावाले, पोना/रवि माने,पोकाॅ/आसिफ शेख,सचिन गायकवाड,सचिन मागाडे व चापोना/केशव पवार यांनी बजावली आहे.
 
Top