बेपत्ता मुले मुली परतल्यावर समुपदेशनासाठी सामाजिक संस्थाच्या मदतीने कार्यक्रम तयार करण्याचे निर्देश -डॉ नीलम गोऱ्हे

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सायबर क्राईममध्ये मोठ्या प्रमाणात वाढ 

मुंबई ,दि.०७/१०/२०२० - संपूर्ण जगामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सायबर क्राईममध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे .यामध्ये अनेक तरुण मुले आणि मुली गुंतत आहेत तसेच अनेक टोकाच्या भूमिकाही घेत आहेत,असे निदर्शनास येत असल्याचे डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

लहान मुलांच्यावर होणारे संस्कार हे महत्वाचे

सायबर गुन्ह्यातील महिला सुरक्षेबाबत तसेच राज्यातील बेपत्ता झालेल्या महिलांच्या प्रश्ना संदर्भात आणि रेल्वे प्रवाशांमधील महिलांच्या सुरक्षेबाबत राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्याबरोबर वेबिनार मीटिंग घेतली. त्यावेळी पोलिसांना सूचना देताना त्यांनी ई-मेलद्वारे ही जर महिलांनी तक्रारी केल्या तर त्याबाबत तात्‍काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू करावा अशा सूचना दिल्या. मॅट्रिमोनियल साईटवर बोगस माहिती देऊन मुलींना फसविणे व त्यांचावर लैगिक अत्याचार करणे तसेच लहान मुले व मुलींवर लैंगिक अत्याचार याची संख्या वाढलेली आहे. लहान मुलांच्यावर होणारे संस्कार हे महत्वाचे असल्याने त्यांना सायबर क्राईमबाबत आवश्यक प्रशिक्षण देणेबाबत प्रयत्न करावेत. यामध्ये अनेक सामाजिक संघटना काम करतात. त्यांना या प्रशिक्षणामध्ये समाविष्ट करावे. तसेच हे प्रशिक्षण सर्व पालकांनाही द्यावे असे डॉ गोऱ्हे यांनी सूचित केले.

दि १४ नोव्हेंबर ते १० डिसेंबरपर्यंत सायबर सुरक्षा व महिला हिंसाचार विरोधी प्रशिक्षण सप्ताह सुरू करावा.अनेक मुले मुली मोठ्या प्रमाणात घरातून गायब होतात. या मागील कारणे शोधावीत.या मुलांना शोधल्यानंतर तज्ज्ञांचे मार्गदर्शनाखाली काउन्सलींग करावे, यासाठी सामाजिक संस्थांचे सहकार्य घ्यावे असे ही डॉ गोऱ्हे म्हणाल्या.
यावेळी पंढरपूर सोलापूर येथील ऑगस्ट २०१९ मधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व कडेगाव सांगली जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकाने मुलीवर आमिष दाखवून केलेला बलात्कार तपास अनेक दिवसांपासून प्रलंबित असून या बाबतही पोलीस अधीक्षक सोलापूर व सांगली यांना आवश्यक निर्देश देण्यात आले.
वरील चर्चेमध्ये अतिरिक्त पोलिस महासंचालक राजेंद्र सिंग,विशेष पोलीस महानिरीक्षक (सायबर गुन्हे) यशस्वी यादव ,श्री बैजल उपमहानिरीक्षक (सायबर गुन्हे) यांनी भाग घेतला. रेल्वे मधील महिला सुरक्षाबाबत श्री सेनगावकर आयुक्त रेल्वे यांनी उपसभापती डॉ.नीलमताई गोर्हे यांनी केलेल्या सर्व सूचनांचे १००%पालन करण्यात रेल्वे सुरक्षा पोलीस यशस्वी झाले आहेत व तुरळक अपवाद सोडल्यास सर्व केसेसमध्ये चार्जशीट दाखल झाल्याचे सांगितले.डॉ गोऱ्हे यांनी यामध्ये जखमी होणाऱ्या नागरिकांना रेल्वे विभागाने आर्थिक मदत देणेबाबत काय सुविधा केल्या याबाबत तपासणीसाठी सूचना दिल्या.

ठाणे व पुणे शहरातील वाहतुकीच्या कोंडी बाबत सिडको, एमएमआरडीए व पीएमआरडीए यांच्या मधील भूखंड पार्किंगसाठी उपलब्ध करून देणे साठी पाठपुरावा करू असे सूचित केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय शिंदे ,पुणे व ठाणे शहराचे गुन्हे शाखेचे उपायुक्त दीपक देवरा व वाहतूक उपायुक्त अमित काळे हजर होते.
 
Top