त्याग,सेवा, बंधुभाव, राष्ट्रीय एकात्मता ,व्यसनमुक्ती, सुसंस्कार यांची दिली शिकवण 

सांगली,१८/१०/२०२० -परोपकाराय फलती वृक्ष परोपकाराय बहन्ती नद्या ज्याप्रमाणे वृक्ष हे दुसऱ्याकरिता फुलतात ,फळतात,बहरतात किंवा नद्या या सर्वसामान्यांसाठी वाहतात, तद्वतच लोकोत्तर महामानवाचे कार्य असते . वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे हे अशाच महामानवाच्या मालिकेतील एक होते.समाजामध्ये सदाचार, सद्भावना, सामंजस्य,संयम,क्षमता या सकारात्मक बीजाचे अंकूरण त्यांनी केले. त्याग,सेवा, बंधुभाव, राष्ट्रीय एकात्मता ,व्यसनमुक्ती, सुसंस्कार यांची शिकवण दिली. समाजातील वाढत्या व्यसनाधीन तीने व्यथित होऊन समाज विशेषतः युवा पिढी व्यसनमुक्त - धर्मप्रवन करणे हे त्यांनी आपले जीवनकार्य ठरविले.अशा वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांचा जन्म दिनांक १८ ऑक्टोबर १९५६ रोजी दरूर,तालुका अथणी, जिल्हा बेळगाव येथे झाला. शालेय शिक्षण, संस्कार संवर्धित बाहुबली गुरुकुलात झाले. गुरुदेव समंतभद्र महाराज यांच्या सानिध्यात त्यांनी धार्मिक व लौकिक शिक्षण घेतले महाविद्यालयीन शिक्षण जयसिंगपूर कॉलेजमध्ये झाले. येथे त्यांच्या अंगच्या वक्तृत्व व संघटन कार्याचे बीजांकुरन झाले. विद्यापीठस्तराच्या वक्तृत्व स्पर्धेतील यशामुळे ते सर्वतोमुखी झाले . शांतीसागर युवक मंडळाची स्थापना करून युवक चळवळीत सक्रिय झाले.

साधी राहणी, उच्च विचारसरणी प्रसिद्धी परान्मुखता

महाविद्यालयीन शिक्षणानंतर वकिलीच्या निमित्ताने सांगली बोर्डिंगमध्ये रुजू झाले आणि वीरसेवा दलाला एक सक्रिय कार्यकर्ता लाभला.वीरसेवा दलातील त्यांचे आगमन झंजावात ठरले .सततचे निरीक्षण,चिंतन,अखंड प्रवास, समाजातील सर्व स्तरातील व्यापक संपर्क यामुळे समाज मनाची नेमकी नस त्यांना सापडली होती. युवकांतील वाढती व्यसनाधीनता, धर्माबद्दलची अनास्था पाहून सुसंस्काराचे दृष्टीने त्यांनी धार्मिक संस्कार शाळेचा उपक्रम सुरू केला. बरोबरीने व्यसनमुक्ती संस्कार स्थापनासाठीच्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणून आपल्या अंगी असलेल्या वक्तृत्व कलेचा वीर सेवादल संघटना बांधण्यासाठी कौशल्यपूर्वक वापर केला. व्याख्यान प्रबोधनातून समाजपरिवर्तन हे लक्ष्य ठरविले गेले. अत्यंत अल्पावधीत त्यांनी आपल्या निस्पृह कार्यपद्धतीमुळे वीर सेवा दलाची कार्य कक्षा रुंदावल्या.वीर सेवादल प्रत्येकाच्या घराघरां मध्ये मनामनामध्ये पोहचवण्याचे श्रेय त्यांना द्यावे लागेल.
जगाच्या कल्याणा,संतांच्या विभूती
देह कष्टविती उपकारे
ही उक्ती त्यांनी आपल्या कृतीद्वारे सार्थ करून दाखवली. त्यांनी दिशाहीन युवकांना धर्मकामी लावले.व्यसनात गुंतून उद्ध्वस्त होऊ पाहणाऱ्यांना त्यापासून परावृत्त केले .त्याग, सेवा आणि समर्पण या माध्यमातून सर्व समाजाला त्यांनी दिशा देण्याचा प्रयत्न केल्या. व्यसनाच्या वाढत्या भयावतेचा वेध त्यांच्यातील द्रष्टेपणाने फार पूर्वीच घेतल्याचे दिसून येते. कारण देशातील पहिल्या व्यसनमुक्ती दिंडीचे आयोजनही त्यांनी केले होते . साधी राहणी, उच्च विचारसरणी प्रसिद्धी परान्मुखता हा तर त्यांचा स्थायिभाव बनला होता. उच्च विभूषित असूनही कपड्यांचा त्यांनी त्याग करून जाणीव पूर्वक खादीचा अंगीकार आपल्या नित्य वापरात केला होता.

कदाचित बाबासाहेबांच्या उक्ती आणि कृतीमध्ये एकवाक्यता होती.त्यांचे आचरण श्रेष्ठ ठरावे असेच होते. इतरांना संयमाचा विचार मांडत असताना ते स्वतःही संयमी राहून नैतिकता जोपासत होते. यातूनच सर्वच ठिकाणी स्वच्छता करणे, कार्यक्रम स्थानी इतरांना त्रास होऊ नये यासाठी खडे वेचणे पूजा विधानप्रसंगी जेवणावळीतील ताटे उचलण्या पासून गर्दीसमयी जनसामान्यांच्या सेवेसाठी ते स्वतःला धन्य समजत होते. यापुढेही जाऊन वस्तीगृहातील स्वच्छतागृहे साफ करायला ही या महामानवाला कधी कमीपणा वाटला नाही.

    हजारो युवकांचे नेतृत्व करीत असताना नेते पणाचा लवलेशही वीराचार्यांना स्पर्श करू शकला नाही याच व्रतस्थवृत्तीने त्यांनी आपली सेवांमयी वाटचाल ठेवली होती. अशा या अलौकिक महामानवाचे समाजकार्य १६ ऑगस्ट १९८८ ला थांबले. वीराचार्य यांच्या रूपाने मिळालेले दान नियतीने आपणाकडून परत घेतले. बाबासाहेब आज आपल्यात नाहीत,उरले आहे ते फक्त त्यांच्या वृत्तीचे वर्णन करणारे, शक्तीचे सामर्थ्य सांगणारे त्यांच्या जीवनाचा सारीपाट मांडणारे स्मृतीचे , कृतीचे प्रसंग. केवळ समाजाला उपदेश,कर्मकांड सांगणाऱ्या विविध समाजातील साधू,बाबा यांच्या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांचे जीवन म्हणजे बिघडत चाललेल्या समाजजीवनाला लाभलेला परिसस्पर्ष म्हणावे लागेल. युवकांच्या मनात सेवीचे संस्काराचे धर्मप्रवणंततेचे त्याचे स्फुल्लिंग चेतवणारे देशधर्म समाजाची व्रतस्थ सेवा करणाऱ्या बाबासाहेबांचा कृतिशील वसा, वारसा घेऊन त्यांचे कार्य कोणी पाऊल तर कुणी पायरी बनून चिरंतन चालवूया हीच त्यांना कृतिशील आदरांजली ठरेल.

एन.जे.पाटील,नांद्रे
 
Top