दलित आदिवासी सवर्णांसह सर्व समाजाला एकत्र करून हिमाचलमध्ये रिपब्लिकन पक्ष मजबूत करणार - केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले
मनाली दि.१३/१०२०२० - हिमाचल प्रदेश निसर्ग रम्य असून पर्यटनासाठी लोकप्रिय आहे. येथे नुकतेच अटल टनेल या जगातील सर्वात उंचावरील लांब असलेल्या टनेलचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उदघाटन झाले. या टनेलमुळे हिमाचलमध्ये पर्यटनाला अधिक चालना मिळेल त्यासोबत उद्योगाला ही चालना मिळेल.हिमाचल प्रदेशात उद्योग उभारण्यासाठी देशभरातील उद्योजकांनी पुढे आले पाहिजे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
मनाली येथील हॉटेल शुभमच्या सभागृहात हिमाचल प्रदेश रिपब्लिकन पक्षाच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात हिमाचल प्रदेशच्या राज्य कार्यकारिणीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची फिजिकल डिस्टन्सचा नियम पाळून झालेल्या बैठकीत ना रामदास आठवले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी हिमाचल प्रदेश रिपाइंच्या राज्य कमिटीच्या अध्यक्षपदी विजय शर्मा यांची निवड करण्यात आल्याची अधिकृत घोषणा ना.रामदास आठवले यांनी केली.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष साकार करण्यासाठी हिमाचल दलित आदिवासी सवर्णसह सर्व समाजाला निळ्या झेंड्याखाली एकत्र करण्याचे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले. हिमाचलमध्ये २४ टक्के लोकसंख्या दलितांची आहे.हिमालया हुन उंच महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे कर्तृत्व असून त्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या शाखा हिमाचल प्रदेशच्या गावागावात उभ्या करा,असे आवाहन ना रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना केले.