या रविवारी सुरु राहणार नगरपालिकेचा सरकारी दवाखाना - विवेक परदेशी, आरोग्य सभापती.
      पंढरपूर, १७/१०/२०२० - पंढरपूरात आलेल्या पाण्यामुळे बरेच ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. नगरपालिकेचे सरकारी दवाखाना व काळा मारुती येथेही पाणी आले. पाणी ओसरताच त्वरीत वैद्यकीय अधिकारी डॉ बजरंग धोत्रे, तनुजा सिताप सिस्टर, जगताप कृष्णकुमार, ईश्वरकट्टी अविनाश,लोंढे, आरोग्य सभापती, नगरपालिकेचे कर्मचारी यांनी त्वरित साफसफाई करुन, दवाखान्याची सफाई करण्यात आली. सायंकाळी ओल सुकल्यानंतर महत्वाचे सामान लावून सगळे सुरळीत करणार असल्याचे सांगितले. पुराचे पाणी ओसरताच लगेच स्मशानभुमी व दवाखाना स्वच्छ करण्यात आला. विशेष म्हणजे सर्व स्टाफ व डॉक्टरांनी स्वतः पुढाकार घेतला. रविवार नगरपालिकेचे दवाखान्याला सुट्टी असते पण वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आरोग्य सभापती यांनी विचारविनिमय करुन नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी रविवारी सकाळी १० ते १२ या वेळेत पेशंट संपेपर्यंत दवाखाना चालु ठेवण्याचा निर्णय घेतला. आरोग्य विभागातील कर्मचारीही स्वच्छतेचे काम करणार आहेत. सोमवार ते शनिवार नगरपरिषद संचलीत सरकारी दवाखाना (गोवींदपुरा) सकाळी ९.०० ते १२.३० व काळा मारुती सेंटर दुपारी ५.०० ते ६.३० या वेळेत चालु राहील.स्वयंस्फूर्तीने घेतलेल्या निर्णयामुळे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर व नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांनी डॉक्टर व कर्मचारी यांचे कौतुक केले.

  तसेच पंढरपूरात पुढील काही दिवस विविध भागात स्वच्छता मोहीम व निर्जंतुकीकरण करण्याची मोहीम राबवली जाणार असल्याचे सभापती विवेक परदेशी यांनी सांगितले.कोरोना व पुराच्या पाश्वभुमीवर कोणीही कोणताही त्रास अंगावर काढु नये, तातडीने वैद्यकीय मदत, उपचार घ्यावे असे सांगून  सभापती परदेशी यांनी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.
 
Top