‘शेती आणि शेतीपूरक व्यवसायास कर्जमाफी योजनेतून चालना मिळते’ पी.एच.डी.संशोधनातून निष्कर्ष -डॉ. अनिल मेमाणे
  पंढरपूर ,२३/१०/२०२० - ‘शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च आणि त्यातून मिळणारे उत्पन्न यातील तफावत वाढत गेल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहे.शेतकऱ्यांना नेहमीच आस्मानी व सुलतानी संकटांचा सामना करावा लागतो. परिणामी शेतामध्ये पिकांचे अधिक उत्पादन घेवून देखिल शेतकरी कायम कर्जाच्या बोजाखाली दबून राहतो. त्यामुळे शासनाने त्यांना विविध प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून सवलती देणे आवश्यक आहे. शेतकरी विकासासाठी शासनाने राबविलेल्या अनेक योजनांचा शेतकऱ्यांना अधिक फायदा होतो. अशा प्रकारच्या कर्ज सवलती आणि कर्जमाफी या योजनांच्या माध्यमातून शेती तसेच अल्प-मध्यम भूधारक शेतकऱ्याचे पुनरुज्जीवन करण्याचे महत्वपूर्ण कार्य साध्य होत असल्याचा निष्कर्ष डॉ. अनिल मेमाणे यांच्या पीएच.डी. संशोधानातून पुढे आला आहे.’ 

    २००८ च्या शेतकरी कर्ज सवलत व कर्जमाफी योजनेचा महाराष्ट्राच्या नाशिक जिल्हयात पडलेल्या सामाजिक आणि आर्थिक प्रभावाचा चिकित्सक अभ्यास’ या विषयाचा पीएच.डी. संशोधन प्रबंध सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास सादर करण्यात आला होता. या संशोधन प्रबंधात वरील निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. 

   रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कुंडलिक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.अनिल सदाशिव मेमाणे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास अर्थशास्त्रातील पीएच.डी.पदवीसाठी संशोधन प्रबंध सादर केला होता. डॉ.अनिल मेमाणे यांना सा.फुले पुणे विद्यापीठातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.विलास आढाव यांचेही मार्गदर्शन लाभले. मेमाणे यांच्या पीएच.डी. संशोधन प्रबंधास विद्यापीठाकडून मान्यता देण्यात येवून त्यांना पीएच.डी.पदवी प्रदान करण्यात आली. 

      डॉ.अनिल मेमाणे यांच्या या यशाबद्दल डॉ. बजरंग शितोळे , डॉ.टी.एन.लोखंडे , डॉ.एस.पी. शिंदे, डॉ.समाधान माने, डॉ.अमर कांबळे आदींसह सर्व सहकार्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे . 
 
Top