समानतेकडून विकासाकडे जाण्याच्या मार्गा बद्दलचे चिंतन करणारे डॉ. नीलम गोऱ्हे यांचे नवे पुस्तक...
  पुणे,(डॉ अंकिता शहा),दि.२४/१०/२०२० - राज्याच्या विधान परिषदेच्या विद्यमान उपसभापती आणि अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्त्वातून महाराष्ट्राच्या राजकारणावर स्वतःचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांचे नवे पुस्तक पुण्याच्या बुकगंगा पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित होत आहे.

   ‘समानतेकडून विकासाकडे -शाश्वत विकास उद्दिष्टांची ओळख आणि आव्हाने’ असे त्या पुस्तकाचे नाव असून, शाश्वत विकासाची उद्दिष्टे आणि त्या उद्दिष्टांचाच एक भाग असलेल्या स्त्री-पुरुष समानता या तत्त्वाचे विकास प्रक्रियेतील महत्त्व डॉ. गोऱ्हे यांनी त्या पुस्तकातून उलगडले आहे.

स्त्रियांचे प्रश्न सोडवण्यासाठी डॉ. नीलम गोऱ्हे गेली अनेक वर्षे कार्यरत

   स्त्रियांचे प्रश्न सोडवण्यासाठी डॉ. नीलम गोऱ्हे गेली अनेक वर्षे कार्यरत असून,त्या अनुभवांवर, तसेच राजकीय कारकिर्दीतील अनुभवांवरही डॉ. गोऱ्हे यांनी आतापर्यंत अनेक पुस्तके लिहिली आहेत. स्त्री प्रश्नांबाबतचा त्यांचा अभ्यास केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून, १९९५ साली बीजिंग येथे झालेल्या संमेलनापासून त्या विकास आणि स्त्रियांच्या प्रश्नांसंदर्भातील आंतरराष्ट्रीय धोरणात्मक लढाईचा भाग असलेल्या महत्त्वाच्या नेत्या आहेत. 

   संयुक्त राष्ट्रसंघाने निश्चित केलेली शाश्वत विकास उद्दिष्टे हा जगासमोरील अनेक आव्हानांना एकत्रितरीत्या तोंड देण्या साठी विचार करून तयार करण्यात आलेला सर्वसमावेशक आराखडा आहे. तो आराखडा विकसित करण्यातही अनेक स्त्रियांचा सहभाग आहे.या पार्श्वभूमीवर, या शाश्वत विकास उद्दिष्टांची ओळख करून देण्याच्या उद्देशाने डॉ. गोऱ्हे यांनी हे पुस्तक लिहिले आहे. स्त्री-पुरुष समानता हे या शाश्वत विकास उद्दिष्टांपैकीच एक उद्दिष्ट आहे. विकासाच्या दृष्टीने हे उद्दिष्ट कसे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, यावर डॉ.गोऱ्हे यांनी आपल्या अभ्यासातून या पुस्तकाद्वारे प्रकाश टाकला आहे.विशेषतः १आँक्टोबरला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभा UNGA ने २०२० ते २०३० हे Decade of Action कृती दशक म्हणून जाहिर केले आहे. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर नीलम गोर्हे यांच्या या पुस्तकाला वेगळेच महत्व आहे.

    एकूण १७ शाश्वत विकास उद्दिष्टांची सविस्तर ओळख डॉ. गोऱ्हे यांनी या पुस्तकातून करून दिली आहे.तसेच,शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांबाबत राज्यांची कामगिरी कशी आहे याचाही ऊहापोह केला आहे. २०१५चा पॅरिस करार आणि जागतिक राजकारण, विधिमंडळ - राज्य सरकार आणि हवामानबदल, बीजिंग संमेलनानंतरची २५ वर्षे या प्रकरणांमधून त्यांनी विविध आनुषंगिक विषयांच्या सद्यस्थितीवर विवेचन केले आहे. यंदा आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे शाश्वत विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेवर कसा परिणाम होणार आहे, याचे चिंतनही त्यांनी या पुस्तकातून मांडले आहे.

  'अंधारलेल्या आकाशात आशेचे काही कवडसे दिसत असले, तरी स्त्रियांच्या विकासाचा सामूहिक व वैयक्तिक आत्मशोध अजूनही संपलेला नाही, असे सातत्याने जाणवते. आजच्या संदर्भात जेव्हा आपण समानतेकडून शाश्वत विकासाकडे जाण्याचा विचार करतो, तेव्हा त्याची गरज का भासते,याचा विचार करणे गरजेचे आणि महत्त्वाचे आहे,’ अशा शब्दांत डॉ.निलमताई गोऱ्हे यांनी हे पुस्तक लिहिण्यामागची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

   शाश्वत विकास उद्दिष्टांविषयी तसेच देश आणि राज्य पातळीवरील त्यांच्या अंमलबजावणीविषयी विस्तृत माहिती देणारे हे मराठीतील महत्त्वाचे लेखन आहे.समाजशास्त्र,राज्यशास्त्र,स्त्रिया, विकास यांसह अन्य मानव्यविद्या शाखांतील अभ्यासक, धोरणकर्ते आणि जिज्ञासूंसाठी हे पुस्तक म्हणजे महत्त्वाचा ठेवा ठरेल. तसेच, स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांकरिताही हे पुस्तक संदर्भ ग्रंथाची भूमिका निभावू शकेल. 

   हे पुस्तक २७ ऑक्टोबरपासून BookGanga International Book Service, Deccan Gymkhana,Pune आणि इतर सर्वत्र उपलब्ध होत आहे. हे पुस्तक ई-बुक स्वरूपातही प्रकाशित होणार आहे.
https://www.bookganga.com/R/89NOCBookGanga.com या संकेतस्थळावरून वाचक हे पुस्तक घरपोच मागवू शकतात.
 
Top