पावसामुळे अतिवृष्टी झाल्याने शेत पिकांचे मोठे नुकसान

पंढरपूर,दि.२३/१०/२०२०- अतिवृष्टीमुळे तसेच धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गामुळे तालुक्यात नदीकाठच्या गावांसह शेतीपिकांचे तसेच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे कृषी सहाय्यक,ग्रामसेवक यांच्या संयुक्त पथकामार्फत करण्यात येत असून, आतापर्यत १३ हजार ३९० हेक्टरवरील पिक नुकसानीचे पंचनामे पुर्ण झाले असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

पंचनाम्यासाठी १०९ पथकांची नियुक्ती

   तालुक्यात शहरासह  एकूण ९५ गावांमधील १० हजार ७१२ शेतकऱ्यांचे १३ हजार ३९० हेक्टर वरील पिकांचे पंचनामे आतापर्यंत पुर्ण झाले आहेत.तसेच शहरातील ५ हजार ३९६ घरांचे तर ५४२ दुकानांचे पंचनामे करण्यात आले असून, ग्रामीण भागातील ४ हजार ७१२ घरांचे पंचनामे करण्यात आले आहेत.पिक नुकसानीचे,बाधित घरांचे व क्षेत्राचे पंचनामे करण्यासाठी शहरासह तालुक्यात १०९ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे . नुकसानग्रस्त सर्वच क्षेत्रांवरील पंचनामे करण्याच्या सूचनास संबधित पथकाला दिल्या असल्याचे प्रांताधिकारी ढोले यांनी सांगितले. 

   परतीच्या पावसामुळे अतिवृष्टी झाल्याने शेत पिकांचे मोठे नुकसान झाले असून,तालुक्यातील ऊस,मका,कांदा,ज्वारी आदी पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तालुक्यातील अतिवृष्टीमुळे तसेच पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकरच पुर्ण करुन नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी ढोले यांनी सांगितले.

    तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेत पिकांची पाहणी लोकप्रतिनिधीसह , प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसिलदार वैशाली वाघमारे,गट विकास अधिकारी रविकिरण घोडके, तालुका कृषि अधिकारी राजेंद्र पवार यांनी केली.

 अतिवृष्टीमुळे व धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे चंद्रभागानदीला पूर आल्याने शहरातील नदीकाठा वरील लोकवस्तीत मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे.या नुकसानीची पाहणी मुख्याधिकारी अनिकेत मानोकर यांनी केली .पुराच्या पाण्यामुळे ठिकठिकाणी चिखल झाला आहे.यामुळे रोगराई पसरु नये यासाठी नगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत स्वच्छता व औषध फवारणी करण्यात येत असल्याचे मुख्याधिकारी मानोरकर यांनी सांगितले.
 
Top