अतिवृष्टीमुळे शेतीचे झालेल्या नुकसानाची कामे मनरेगाच्या मार्फत करण्याची ना.डॉ. नीलम गोऱ्हे यांची शासनास सूचना
पुणे दि.१६ /१०/२०२० - महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी सुरू आहे. यासंदर्भात महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत मुद्दा उपस्थित केला.

याबाबत लवकर ताबडतोबीची मदत फार गरजेची आहे ज्या ठिकाणी घरात पाणी गेलेले आहे अशा पुणे, कोल्हापूर आणि इतर ज्या जिल्ह्यात अति वृष्टी झाली आहे तेथे तयार जेवणाची मदत देण्यात यावी.पंचनामे तात्काळ करून पाऊस ओसरल्या नंतरदेखील पंचनामे सुरू ठेवून शेतकऱ्यांना, नागरिकांना जेवढी जास्त मदत करत येईल तेवढी करावी असे ना.डॉ.गोऱ्हे यांनी सुचवले.

त्याचबरोबर पुणे येथील आपत्कालीन सेवेचा जो नंबर आहे तो ना.डॉ.गोऱ्हे यांच्या बहीण जेहलम जोशी यांनी शिवाजीनगर येथील नाल्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाढते आहे किंवा काय याबाबत चौकशी करण्यासाठी फोन लावला असता त्यांनी ऐकून घेतले व फोन डिसकनेक्ट झाला,नंतर पुन्हा कोणताच प्रतिसाद आला नाही व क्रमांक बिझी आवाज आला.एकुणच पुणें मनपा आपत्ती व्यवस्थापनाची बेफिकिरी याबद्दल ना.डॉ.गोऱ्हे यांनी श्री पवार यांच्याकडे तक्रार करून यात सुधारणा करण्याची सूचना केली.

मनरेगाच्या अंतर्गत ज्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे त्याठिकाणी कामे करण्यासाठी सूचना ना.डॉ.गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांचेकडे केली आहे. मागील वर्षी सांगली, कोल्हापूर येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीच्या नुकसानाची कामे मनरेगाच्या अंतर्गत केल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला होता असे देखील ना.डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले. याबाबत तात्काळ आदेश निर्गमित करण्याची विनंती केली.
 
Top