एकूण संख्येच्या तुलनेत सक्रीय रुग्णांचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा कमी,सक्रीय रुग्णांच्या संख्येत आणखी घट,आता रुग्णसंख्या ७.५ लाखांपेक्षा कमी
  नवी दिल्ली,PIB Mumbai,२०/१०/२०२०- गेल्या २४ तासांत आढळलेल्या कोविड-19 च्या रुग्णांची संख्या सुमारे तीन महिन्यांनंतर ५०००० (४६,७९०) पेक्षा कमी आढळली आहे. याआधी, २८ जुलै रोजी रुग्णांची एका दिवसातली संख्या ४७,७०३ असल्याची नोंद आहे.

दररोज कोविडचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असून मृत्यूदरही सातत्याने घटतो आहे.तसेच सक्रीय रुग्णांचे प्रमाणदेखील सातत्याने कमी होत आहे.

भारताने मिळवलेले आणखी एक यश म्हणजे, एकूण संख्येच्या तुलनेत, सक्रीय रुग्णांचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा कमी झाले आहे. सध्या देशभरात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७.५लाखांपेक्षाही कमी (७,४८,५३८) आहे. आजपर्यंतच्या कोविड रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत सक्रीय रुग्णांचे हे प्रमाण ९.८५% इतके आहे.

सुमारे तीन महिन्यांनंतर पहिल्यांदाच नव्या रुग्णांची संख्या ५०००० पेक्षा कमी


केंद्र सरकारच्या सर्वसमावेशक धोरणानुसार,राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी,एकत्रित आणि निश्चित ध्येय ठेवून केलेल्या प्रभावी अंमलबजावणीचा हा परिणाम आहे.त्याशिवाय देशभरात चाचण्या, त्वरित प्रभावी निरीक्षण आणि ट्रॅकिंग, रूग्णांना त्वरित रुग्णालयात दाखल करणे तसेच प्रमाणित उपचारांच्या प्रोटोकॉलचे कसोशीने पालन करण्यामुळे कोविडविरुध्दच्या लढ्यात हे यश मिळाले आहे. तसेच या लढ्यात देशभर निस्वार्थ सेवा देणारे कोविड योद्धे,डॉक्टर्स,आघाडीवर काम करणारे सर्व कार्यकर्ते यांच्या निस्वार्थ सेवेचाही हा परिणाम आहे.

   सक्रीय रुग्णांच्या संख्येत घट होत असतांना दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. आतापर्यंत ६७ लाखांपेक्षा अधिक रुग्ण (६७,३३,३२८) या आजारातून बरे झाले आहेत. सक्रीय रुग्ण आणि बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येतील तफावत सातत्याने वाढत असून, आज ही तफावत ५९,८४,७९० इतकी आहे.

गेल्या २४ तासांत ६९,७२० रुग्ण बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आता देशाचा रुग्ण बरे होण्याचा सरासरी दर ८८.६३ % इतका आहे.बरे झालेल्या रूग्णांपैकी ७८ % रुग्ण १० राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील असल्याचे आढळले आहे.

महाराष्ट्रात एका दिवसात,सर्वाधिक १५,००० पेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत त्या खालोखाल कर्नाटकात एका दिवसात ८,००० पेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत.

 नव्याने आढळलेल्या रूग्णांमधील ७५% रुग्ण १० राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ या राज्यांत ५,००० पेक्षा अधिक सक्रीय रुग्ण आढळले आहेत.

   गेल्या २४ तासांत देशभरात ५८७ रुग्णांचा मृत्यू झाला.त्यापैकी ८१ % टक्के १० राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहेत. आज सलग दुसऱ्या दिवशी मृतांचा आकडा ६०० पेक्षा कमी आढळला आहे. महाराष्ट्रात एका दिवसात सर्वाधिक म्हणजे १२५ मृत्यूंची नोंद झाली.

   कोविड रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक असलेला भारत एकमेव देश आहे तसेच मृत्यूदर सर्वात कमी असलेल्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो.आज हा मृत्यूदर १.५२% इतका आहे. सक्रीय रुग्णांच्या संख्येत सातत्याने होत असलेल्या घटीचा हा परिणाम आहे.
 
Top