भारतरत्न डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी संरक्षण क्षेत्रात सक्षम स्वरूपाचे कार्य केले-डॉ. बजरंग शितोळे

वैचारिक क्षेत्रात भरीव स्वरूपाचे कार्य करून देशाच्या अतिउच्च पदावर विराजमान होता येते

पंढरपूर – “डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी देशाची संरक्षण यंत्रणा सक्षम करण्यासाठी खूप मोलाचे योगदान देत भारताला प्रबळ करण्याचे कार्य केले आहे.शेतीमधील उत्पादन खर्च कमी करून अधिक उत्पादन मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान मिळवून देण्याचे काम केले.देशाच्या विकासासाठी मुलभूत स्वरूपाचे काम करण्याचा आदर्श घालून देण्याचे कार्य त्यांनी केले.वाचन हा माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारा महत्वपूर्ण घटक आहे. बुद्धीला तेज व मनाला स्फूर्ती देण्यासाठी डॉ. कलाम यांचे जीवन चरित्र विद्यार्थ्यांनी वाचले पाहिजे. वैचारिक क्षेत्रात भरीव स्वरूपाचे कार्य करून देशाच्या अतिउच्च पदावर विराजमान होता येते. याचा आदर्श घालून देण्याचे काम कलामांनी केले.शिक्षण,शेती,उद्योग,व्यापार,आरोग्य,संरक्षण आदी क्षेत्रातील ज्ञान मिळवून विद्यार्थ्यांनी आपली बुद्धी प्रगल्भ केली पाहिजे.वाचनाने विचार,आचार व उच्चार हे प्रगल्भ होतात म्हणून विद्यार्थ्यांनी वाचनाचा व्यासंग जोपासला पाहिजे.” असे प्रतिपादन डॉ. बजरंग शितोळे यांनी केले.

   रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात ग्रंथालय विभाग व महाविद्यालय अंतर्गत गुणवत्ता सुधार समितीच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित ‘वाचन प्रेरणा दिन’ समारंभात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय प्राचार्य डॉ. कुंडलिक शिंदे हे होते. 

युवकांनी डॉ.कलाम यांचा आदर्श समोर ठेवून त्यांचे स्वप्न साकारावे - प्राचार्य डॉ.कुंडलिक शिंदे

     अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. कुंडलिक शिंदे म्हणाले की, “डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी आपल्या देशाला तिसरी आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी कृती आराखडा तयार केला होता. त्यात त्यांनी शिक्षण आणि शेती या दोन मुलभूत गोष्टीवर अधिक भर दिला होता. गुणात्मक उच्च शिक्षण व शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान या महत्त्वपूर्ण बाबींची पूर्तता करण्यावर त्यांनी अधिक भर दिला होता. मात्र शासन आणि प्रशासनातील अकार्यक्षम प्रवृत्तीमुळे हे स्वप्न साकार होवू शकले नाही. युवकांनी डॉ.कलाम यांचा आदर्श समोर ठेवून त्यांचे स्वप्न साकार केले पाहिजे.”

    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता सुधार समितीचे समन्वयक डॉ. अमर कांबळे यांनी केले.प्रमुख मान्यवरांचा परिचय स्वायत्त विभागाचे समन्वयक डॉ.मधुकर जडल यांनी केला.व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास सिनिअर विभागातील उपप्राचार्य व अधिष्ठाता डॉ.निंबराज तंटक, उपप्राचार्य व अधिष्ठाता डॉ लतिका बागल, उपप्राचार्य चंद्रकांत रासकर, अधिष्ठाता प्रोफेसर डॉ.तानाजी लोखंडे, विद्यार्थी कल्याण विभागाचे अधिष्ठाता डॉ.सुखदेव शिंदे, कार्यालयीन प्रमुख अनंता जाधव,सिनिअर,जुनिअर व व्यवसाय अभ्यासक्रमातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. धनंजय वाघदरे यांनी केले तर प्रा. राजेंद्र मोरे यांनी तांत्रिक सहाय्य केले. शेवटी उपस्थितांचे आभार ग्रंथपाल डॉ. विनया पाटील यांनी मानले.
 
Top