भावपूर्ण श्रद्धांजली भागवताचार्य श्री.वासुदेव नारायण उत्पात

पंढरपूर येथील भागवताचार्य श्री.वासुदेव नारायण उत्पात यांना सर्व वा.ना.या नावानेच ओळखत होते त्यांचा मूळ पेशा शिक्षकांचा होता .पंढरपूर येथील कवठेकर प्रशालेत ते शिक्षक म्हणून नोकरीला लागले आणि मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले .निवृत्तीनंतर ते त्या संस्थेचे अध्यक्षही झाले . संस्कृत, मराठी ,इंग्रजी या विषयाचे ते तज्ज्ञ होते . सावरकर साहित्याचे व संतकवी दासगणू महाराज व वरदानंद भारती यांच्या साहित्याचे गाढे अभ्यासक होते. स्वातंत्र्यवीर सावरकर,गीता , महाभारत या विषयावर त्यांनी अनेक व्याख्याने प्रवचने दिली . अनेक ठिकाणी भागवत सांगितले . बैठकीची लावणी हा त्यांचा अभ्यास विषय होता . पंढरपूरचे नगराध्यक्षही ते झाले होते. आणीबाणीत तुरुंगात गेले होते. प्रहार नावाचे साप्ताहिक ते चालवीत होते .

ते आदर्श कुटुंब प्रमुख,नेते ,शिक्षक,प्रवचनकार , पत्रकार , साहित्यिक होते.पंढरपुरात त्यांनी  सावरकर प्रेमी मंडळ स्थापन केले.वाचनालय सुरू केले.सावरकर क्रांतिमंदिर उभे केले.अनेक विद्यार्थी घडविले .त्यांचे आज ८० व्या वर्षी निधन झाल्याचे समजले आणि माझ्यासह अनेकांना दु:ख झाले.त्यांच्या निधनाने भारतीय संस्कृतीची अपरिमित हानी झाली आहे. 

   वा.ना.उत्पात सर हे माझ्यापुढचे एक आदर्श व्यक्तिमत्त्व होते . त्यांनी मला माझ्या भावंडांना संस्कृत ,मराठी ,इंग्रजी हे विषय शिकविले. १२ वी नंतर मी आयुर्वेद महाविद्यालयात प्रवेश घेतला. एम.डी.(आयुर्वेद) झालो.संस्कृत पारंगत झालो. आयुर्वेद महाविद्यालयात प्राध्यापक झालो ही त्यांचीच प्रेरणा.
 
   गेली ४५ वर्षे मी त्यांच्या संपर्कात आहे . मला एखादे यश मिळाले की ते मला फोन करून , पत्र लिहून अभिनंदन करीत.मी नाशिक येथे  सावरकरांच्या गावात रहात आहे याचे त्यांना कौतुक होते .मी पंढरपूरला गेल्यावर पांडुरंगाचे दर्शन घेतले की लगेच त्यांच्या घरी जाऊन त्यांचे दर्शन घेत असे. नाशिक येथे मी त्यांची अनेक व्याख्याने आयोजित केली होती.नाशिकला आले की ते माझ्या घरी येत असत .त्यांचा पदस्पर्श माझ्या घराला झाला हे मी माझे भाग्य समजतो. वा.ना.उत्पात सर हे एक अष्टपैलू व्यक्तीमत्व होते . भारतीय संस्कृतीनुसार त्यांनी चारही पुरुषार्थ  साध्य केले होते. 

   झाले बहू , होतील ही बहु परंतु या समः हा !! 

ही उक्ती त्यांच्या बाबतीत सार्थ ठरते .त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !! 

तव स्मरण सन्तत स्फुरणदायी आम्हा घडो ।
त्वदीय गुणकीर्तन ध्वनि सुरम्य कर्णी पडो ।
स्वदेशहित चिंतानाविण दुजी कथा नावडो ।
तुझ्यासम चि आमुची तनु हि देशकार्यी पडो ।।
ओम शांति : शांति : शांति : ।।

वैद्य एकनाथ कुलकर्णी, नाशिक
 
Top