स्व. हरिश्चंद्र फाउंडेशनच्या "..राज्यस्तरीय स्नेहबंध जीवनगौरव सन्मान 2020 .." चे मानकरी

पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील तावशी(मारापूर) , मेंढापुरमध्ये जन्माला घातलेली "..तमाशा.." ही कला रसिकांच्या मनावर सातत्याने एकीकडे अधिराज्य करत असताना "..वामनराव पाटोळे मेंढापुरकर .." आजही उपेक्षितांचं जगणं जगत आहेत...! कलाकार म्हणून त्यांच्याशी मी फोनवरून घेतलेला आढावा ...!

पंढरपूर तालुक्यातील तावशी येथे कै. गुलाब व विश्वनाथ तावशीकर या बंधूनी स्थापना केलेल्या "..तमाशा पार्टीचा " वारसा अविरतपणे जपत पुढे नेण्याचं काम खऱ्या अर्थाने कै.गुलाबराव यांचे चिरंजीव "वामनराव पाटोळे.."यांनी केलं आहे..!
गुलाबराव यांचं सन १९६९ मध्ये निधन झालं आणि अगदी हसण्या खेळण्याच्या वयातच म्हणजे १४ व्या वर्षीच वामनराव यांचेवर घरच्या आणि तमाशाच्या दोन्ही जबाबदाऱ्या पडल्या..!!
शिकण्याची उमेद असूनही घरच्या गरीब परिस्थिती मुळे जेमतेम तिसऱ्या इयत्तेपर्यंत शिक्षण झालेल्या वामनराव यांचे जगण्याचं खरंखुरं शिक्षण तमाशाची पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील "..नारायणगाव .." येथे. त्यावेळचे सुप्रसिद्ध "...तमाशासम्राट चिंतामण वळकीकर..." यांच्या तमाशा शाळेतून झालं..! बालवयातील संस्कार तमाशाचं बाळकडू चिंतामण वळकीकर यांनी तर दिलेच पण त्याकाळी संपुर्ण भारतात सुप्रसिद्ध झालेली आणि ".. राष्ट्रपती पदक .." सन्मान प्राप्त एकमेव तमाशा मंच म्हणून गाजलेल्या विठाबाई भाऊ - बापू मांग नारायणगावकर यांच्या पार्टीमध्येदेखील आपल्या कलेची चुणूक दाखवून भाऊ -बापू मांग (....हे दोघे चुलते पुतणे होते, तर मंगला बनसोडे, मालती इनामदार,संध्या माने या विठाबाई यांच्या मुली आहेत ...) यांचेकडून शाबासकीची थाप मिळवली..!!

वामनराव यांनी अनेक कलाकारांना एकत्रित घेऊन अगदी वयाच्या १४ व्या वर्षीच तमाशा पार्टी उभा केली हे खरोखरच कौतुकास्पद आणि उल्लेखनीयच म्हणावे लागेल ...! पार्टी उभा करताना वामनराव यांनी पांडुरंग मुळे, रघुवीर खेडकर, कांताबाई सातारकर, सम्राट हरिभाऊ , यांच्या तमाशा फडांमध्ये उत्तम काम केल्याचा अनुभव कामी आणला..!

वीतभर पोटाची भूक भागवण्यासाठी पूर्वी गावोगावच्या जत्रांमधे जाऊन "..भाकरीवर.." तमाशा करायचा आणि पोटाला मिळेल ते वाटून घ्यायचं..! कारण कलाकाराला "..पाठीवर थाप आणि पोटाला दोन घास.." मिळालं तरी यापेक्षा दुसरं कोणतंही मोठं बक्षीस नको असतं...!हीच भावना आजही प्रत्येक कलाकाराची असावी असे वाटते.!

   पूर्वी आजच्यासारखे मोबाईल फोन,फेसबुक, इंस्टाग्राम किंवा व्हाट्सप ग्रुप नव्हते नाहीतर आपल्या सर्वांच्या मॅसेज फॉरवर्डिंगमुळे वामनराव पाटोळे यांच्या पार्टीने आज लाखो रसिकांच्या मनावर मोहिनी घातली असती ..! हळूहळू जसजशी पार्टीची प्रचीती वाढू लागली तसतसे मेंढापुरकर पार्टी "..मानधन.." घेऊन काम करू लागली, कारण पार्टीमध्ये काम करणाऱ्या विविध मंडळींना वेगवेगळ्या ठिकाणाहुन एकत्र आणावे लागायचे मग त्या कलाकारांच्या प्रवासासाठी आणि कुटुंबाची आर्थिक गरज भागविण्यासाठी दोन पैसे गाठीला बांधून देण्यासाठी अगोदरच मानधनाची सोय करावी लागत असायची...!
यासाठी प्रसंगी विविध सावकारांकडून हातउसने म्हणून कर्ज देखील काढावे लागायचे...!!
आजही कर्जाचे ओझे घेऊन तमाशा पंढरीचा राजा दबावामुळे पिचून गेला आहे , तमाशा कला जिवंत राहावी म्हणून सातत्याने धडपडणाऱ्या या नटरंगाने एकेक पैसा जमवून विकत घेतलेला जमिनीचा तुकडा एका सावकाराकडे गहाण पडला होता पण तोही त्या सावकाराने राजकीय वजन वापरून वामनदादानी कष्टाने मिळवलेली जमीन नावावर करून घेतली..!
होतं नव्हतं ते मिळवलेलं सर्वकाही गमावून बसले..!

    वामनरावांचे वडील गुलाबराव हे तमाशात "सरदाराची.." भूमिका करायचे म्हणून निसर्गाने दिलेलं सुंदर व आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि खणखणीत आवाजाची देन वारसा हक्काने रंगमंचावर सरदार, राजा आणि गवळणींना अडवणारा कृष्ण अगदी हुबेहूब साकारण्यात यशस्वी झाली...! 

  दुर्दैवाने"वगसम्राट वामनराव पाटोळे..."तमाशाला उतरती कळा लागली ती म्हणजे बीड जिल्ह्यातील पिंपरी या गावातूनच , त्यावेळी यांच्या पार्टीमध्ये उत्तम नृत्यकाम करून रसिकांना घायाळ  घायाळ करणारी एक चुणचुणीत व तरुण  कलावंतीन ( ..तमाशातील शब्द..)  जिथे तमाशा फड उतरला होता तिथल्या परिसरात असणाऱ्या विहिरीत पाय घसरून बुडून मरण पावली..! जिच्यामुळे दोन पैसे जादा मिळायचे ते अव्वल नंबरी सोनंच कायमचं हरपलं होतं,तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने वामनदादा यांच्या पार्टीला उतरती कळा लागली..! 

 तद्नंतर सन २००० पासून वामनराव यांनी आपले लहान भाऊ अर्थात "मावशी.."  म्हणून काम करणारा गोविंद आणि "कृष्ण .." म्हणून काम करणारा नंदकुमार पाटोळे या पट्टशिष्यांना सोबत घेऊन स्वतंत्रपणे तंबूतले कार्यक्रम सुरू केले. बदलत्या काळानुसार तमाशात गणगवळण, बतावणी ,वग याबरोबरच बरोबरच रंगबाजीला मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात येऊ लागली, गावोगावच्या यात्रा कमिट्याचे लोक तमाशात नाचणाऱ्या व तरुण बायकांची संख्या किती आहे हे पाहूनच तमाशाचे मानधन ठरवू लागले, मग यामध्ये वामनराव पार्टी मानधनात मार खायची..!! 

       तरीही वामनराव न डगमगता आतल्या कलाकाराला स्वस्थ बसू न देता तमाशा कला अजरामर व्हावी म्हणून अगदी कमी मानधनावर देखील काम करीत..! ऑडियो कॅसेट कंपन्यांनी "..३६ नखरेवाली.." ,  सरपंचाचा चाळा बाईवर डोळा, गाढवं आली निवडून आदी कॅसेट्स बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या, अशोक सराफ ,विजय चव्हाण, आणि अलका कुडची आदी कलाकारांनी साकारलेला "..पहिली शेर दुसरी सव्वाशेर आणि नवरा पावशेर. .."  हा चित्रपट  "..३६ नखरेवाली तमाशापटावर आधारित आहे असे वामनराव यांनी सांगितले..! आपल्या उत्तम कलेने अनेकांच्या मनांवर अधिराज्य केलेल्या या महान कलाकाराने ज्यांना मोठं केलं,प्रेरणा दिली, त्या जवळच्या लोकांनी वामनराव यांचं बोट धरून त्यांच्या नावाचा वापर करून नाव तर कमावलंच पण आर्थिक परिस्थिती बदलली की वेगळी चूल मांडून वामनरावांना धोकाही दिला.. ! आजवर केलेल्या आपल्या अपार कष्टाचं काहीच चीज झालं याचं दुःख मात्र त्यांच्या मनात घर करून राहिलं आहे.. !! 
 आज अशा परिस्थितीत संघर्षमय जीवन व्यथित करणाऱ्या या "..अवली नटरंगाची . " कोणत्याही विविध क्षेत्रातील संस्थांनी ना दखल घेतली किंवा सरकार दरबारी आजवर एखाददुसरा सन्मान देखील मिळाला नाही , कलाकारांच्या, साहित्यिकांच्या, पत्रकारांच्या, गुणिजनांच्या जीवनाची ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल..! 
तमाशाची कामे संपल्यावर बाहेर मिळेल ते काम करून आजही वयाच्या ६५ व्या वर्षी जरी पती, पत्नी आजारी असले तरीही त्यांनी धैर्याने आपल्या मुलाबाळांना नातवंडांना मोठं करत हव्या ते शिक्षणासाठी स्वातंत्र्य दिले आहे...! एक मुलगी बी फार्मसी करून पुण्यात नामवंत कंपनीत नोकरी करतेय, एक मुलगी बारावी शिकते, एवढे सारे करूनही वामनराव न खचता उभे मोठ्या धैर्याने राहिले आहेत..! 

 स्व.हरिश्चंद्र फाउंडेशन अर्थात ज्याच्या नावाने मी हे फाउंडेशन चालवत आहे तो हरिश्चंद्र हा देखील अगदी लहानपणापासूनच एक अवलिया कलाकार होता,हरिश्चंद्र हा भजन, कीर्तन, आंबेडकरी जलसे, तमाशा, ऑर्केस्ट्रा ,बँजो पार्टी,बँड पार्टी, जागरण गोंधळ आदी विविध प्रकारच्या कलांमध्ये खुप पारंगत होता, विशेष म्हणजे त्याला या कला नैसर्गिकरित्या कलेच्या देवाने जणू जन्मजातच बहाल केल्या होत्या, तोंडात सरस्वतीचे गोड बोल ठेवून इतरांच्या  चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या म्हणूनच वामनरावांचा यथोचित आदरसत्कार व्हावा याचसाठी स्व.हरिश्चंद्र फाउंडेशनने यंदाचा "...राज्यस्तरीय स्नेहबंध जीवनगौरव पुरस्कार .." जाहीर केला आहे..! 

 (लेखन : - श्री कृष्णा गायकवाड (सर) ,
संस्थापक स्व.हरिश्चंद्र फाउंडेशन, 
चेअरमन स्नेहबंध वाचनालय ,
संपर्क प्रमुख दि म्युनिसिपल युनियन ( एल वार्ड) बृहन्मुंबई महानगरपालिका, 
सदस्य संगीत कला व अकादमी शिक्षण विभाग त्रिवेणी संगम बिल्डिंग, करी रोड , मुंबई
 
Top