‘साहित्य मंजिरी’ हे पाहिलं वहिलं डिजिटल महिला साहित्य संमेलन संपन्न

मुंबई ,दि २६ सप्टेंबर २०२०-स्त्री आधार केंद्र, मुंबई मराठी पत्रकार संघ आणि महिला आर्थिक विकास महामंडळ या संस्थांतर्फे आयोजित ‘साहित्य मंजिरी’ हे पाहिलं वहिलं डिजिटल महिला साहित्य संमेलन सुफळ संपन्न झाला .


स्त्री आधार केंद्र,मुंबई मराठी पत्रकार संघ आणि महिला आर्थिक विकास महामंडळ या संस्थांतर्फे ‘साहित्य मंजिरी’ या पहिल्या वहिल्या डिजिटल महिला साहित्य संमेलनाचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस अत्यंत दिमाखात पार पडला. दुपारी २.३० ते ५ या वेळेत डिजिटल माध्यमांद्वारे पार पडलेल्या या संमेलनाच्या दोन्ही दिवशी रसिकांनी आनंद घेतला.

अनेक साहित्यप्रकारांचा वारसा असाच पुढे जावा यासाठी प्रयत्नशील-डॉ. नीलम गोऱ्हे

संमेलनाच्या सुरुवातीला स्वागताध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे, मा. उपसभापती महाराष्ट्र विधानपरिषद, यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.त्याचबरोबर अशा प्रकारची डिजिटल महिला साहित्य संमेलनं महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात व्हावीत.त्या वाटचालीत वैश्विक मराठी महिला साहित्य डिजीटल संमेलन आयोजन करण्याचा मानसही डॉ. नीलम गोर्हे यांनी व्यक्त केला.महाराष्ट्राला लाभलेला ललित साहित्य, कादंबरी, कथा, चरित्रात्मक वाङमय, राजकीय समीक्षा अशा अनेक साहित्यप्रकारांचा वारसा असाच पुढे जावा यासाठी त्या प्रयत्नशील असणार आहेत अशी घोषणा देखील डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केली. महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे आयोजित राज्यस्तरीय उखाणे स्पर्धेचा निकाल अध्यक्ष श्रीमती ज्योती ठाकरे आणि डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या साक्षीने जाहीर करण्यात आला.

यानंतर लेखिकांच्या नजरेतून बदलते नातेसंबंध या विषयवार परिसंवाद पार पडला. या परिसंवादात सुप्रसिद्ध लेखिका सिसिलिया कार्व्हालो, नीरजा, शिल्पा कांबळे यांचा सहभाग होता, तर अंजली कुलकर्णी यांनी या परिसंवादाचं सूत्रसंचालन केलं. स्त्रीकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन साहित्या तून, साहित्यातील नातेसंबंधातून कशाप्रकारे दर्शवला जातो याविषयी या प्रेसंवादात चर्चा करण्यात आली. साहित्य हा समाजमनाचा आरसा आहे असं म्हटलं जातं पण हा आरसा जो धरतो त्याप्रमाणे त्यात प्रतिबिंब उतरतं. म्हणूनच जास्तीत जास्त लेखिकांनी हा आरसा आपल्या हातात घेऊन आपला दृष्टीकोन समाजाला द्यावा अशी मतं परिसंवादात सहभागी लेखिकांनी व्यक्त केली

परिसंवादाचं सत्र पार पडल्यानंतर मंदाकिनी पाटील,योगिनी राऊळ आणि छाया कोरगावकर यांनी आपल्या कवितांच्या सादरीकरणातून संमेलनाची शोभा वाढवली. संमेलनाच्या अध्यक्ष ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून स्त्री लेखिकांना मार्गदर्शन केलं, सजगता दिली आणि पुढे जाण्यासाठी एक दिशा दिली. साहित्यिक म्हणून त्यांच्या मते आपण कुठे थांबायला हवं हे देखील त्यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केलं.

शेवटी संमेलनाच्या निमंत्रक सुप्रसिद्ध निवेदिका उत्तरा मोने यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, अशा प्रकारच्या साहित्य संमेलनांमधून स्त्री साहित्या विषयी लोकांमध्ये एकप्रकारे जनजागृती होत आहे आणि समाजाचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन नक्कीच प्रगल्भ होत आहे असं त्या म्हणाल्या. मुंबई मराठी पत्रकार संघाचे विश्वस्त प्रकाश कुलकर्णी यांनी संमेलनाचा समारोप केला तर महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले.

साहित्य मंजिरी या डिजिटल साहित्य संमेलनाला दोन्ही दिवशी देश – विदेशातील हजारो रसिकांनी हजेरी लावली. संमेलन डिजिटल माध्यमांद्वारे पार पडल्याने ज्या रसिकांना या लाइव्ह कार्यक्रमाचा आस्वाद घेता आला नाही ते रसिक अजूनही हा कार्यक्रम बघू शकतात. कार्यक्रम पाहण्यासाठी https://www.facebook.com/mitigroup या लिंक वर जाऊन मिती ग्रुप हे फेसबुक पेज लाईक करा.
अधिक माहितीसाठी संपर्क – ९९३०११५७५९, ९९६०३२५१११.
 
Top