शेतीपूरक उद्योगांना चालना

पंढरपूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक व क्रीडा मंडळ यांच्यावतीने सध्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमी वर शासनाने सांगितलेल्या मास्क वापरणे, फिजिकल डिस्टसिंग ठेवून सर्व नियमांचे पालन करून गीरगाय पालन, कुक्कूट पालन व बंदिस्त शेळीपालन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून  पंढरपूर व परिसरातील शेतकरी ,नवउद्योजक, सुशिक्षित बेरोजगार, युवक व महिला बचत गट यांना स्वयंरोजगार मिळणेसाठी तसेच शेतीपूरक उद्योगांना चालना देवून प्रगतशील करणेसाठी व दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी, सुशिक्षित बेरोजगार महिला व पुरूष यांच्यासाठी दि.१०सप्टेंबर ते १२ सप्टेंबर २०२० या कालावधी मध्ये सकाळी ११.०० ते दुपारी २.०० या वेळेत पंढरपूर येथील श्री संत गाडगे महाराज मठ, स्टेशन रोड  येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेच्या मुख्याधिकारी डॉ.साधना उगले (मो.8208404208) यांनी दिली.

ग्रामीण भागातील युवकांमध्ये स्वत:च्या व्यवसायाविषयी जनजागृती

  सध्या सेंद्रिय दुधाची वाढती मागणी,लोकांचे देशी गाईचे दूध खाण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता देशी गायी पालनाला खूप महत्व प्राप्त झाले आहे. म्हणूनच बरेच शेतकरी या व्यवसाया कडे वळत आहेत. या तांत्रिक प्रशिक्षणामध्ये गीरगाय पालन, कुक्कूट पालन व शेळीपालन यामध्ये जाती, निवड व प्रजनन, गीरगाय, कुक्कूट व शेळ्यांचा आहार, गोठा व्यवस्थापन (निवारा), चारा साठवण पध्दत, आजार, उपचार व नियंत्रण, शेळ्यांचे दूध-उपयोग, या सर्वाचे अर्थशास्त्र, या विषयी माहिती मिळणार आहे. तसेच उद्योजकीय प्रशिक्षणामध्ये प्रभावी संवाद कौशल्य, कार्पोरेट मार्केटिंग, उद्योजकीय व्यक्तीमत्व विकास,बाजारपेठ पाहणी,विक्री कौशल्य, गीरगाय, कुक्कूट  व शेळी पालन पूरक उद्योगातील संधी, शासकीय व निमशासकीय कर्ज योजना व अनुदानाची माहिती, जिल्हा उद्योग केंद्राच्या व नाबार्डच्या विविध योजनांची माहिती व प्रकल्प अहवाल तयार करणे आदि माहिती या प्रशिक्षणातून दिली जाणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील युवकांमध्ये स्वत:च्या व्यवसायाविषयी जनजागृती होणार आहे.

निसर्ग व पाणी यामुळे शेतकरी सतत अडचणीत येत आहेत.त्यामुळे शेती व्यवसाय हा उद्योग म्हणून उभारणी घेत नसल्याने यास पर्याय म्हणून पशुधन जोपासणे काळाची गरज आहे. कमी चारा, कमी पाण्यात व कमी जागेत हा उद्योग प्रशिक्षण घेवून केल्यास बेरोजगारीची गंभीर समस्या संपून शेतकरी व सुशिक्षित बेरोजगार यांना उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध होत आहे.

या प्रशिक्षणासाठी पात्रता म्हणजे व्यवसाय करण्याची तीव्र इच्छाशक्ती आवश्यक आहे. या प्रशिक्षणासाठी फक्त १५ जागाच असणार आहेत. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र मिळणार आहे.त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करावा, असे आवाहन डॉ.साधना उगले यांनी केले आहे.
 
Top