दहा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

पालघर - वालीव पोलीस ठाण्याकडून ऑनलाइन फ्रॉड (Online fraud) करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करून दहा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.लॉकडाउनच्या काळात सामान्य नागरिकांना वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या सुरस योजना सुचवून भूलथापा देऊन त्यांना ऑनलाइन गंडा घालण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे अशा घटनांना आळा घालून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देऊन अशा भूलथापांना बळी पडण्यापासून प्रवृत्त करण्या करिता तसेच सदर ऑनलाईन फ्राँड करणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत सूचना पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे ,पालघर यांनी दिल्या होत्या .

त्यानुसार शुक्रवारी चार सप्टेंबर रोजी पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिस अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विश्वासू बातमीदारांकडून गरीब व गरजू नागरिकांच्या आर्थिक विवंचनेचा गैरफायदा घेऊन त्यांना वीस-पंचवीस हजाराचे आमिष दाखवून मोबदल्यात त्यांचे बँकेत खाते उघडणे करता आवश्यक मूळ कागदपत्र प्राप्त करून त्यांचे नावे विविध बँक शाखांमध्ये बचत खाते उघडून तसेच नमूद नागरिकांच्या विविध कागदपत्रांच्या आधारे वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल सिम कार्ड मिळवून प्राप्त मोबाईल क्रमांकाच्या आधारे बँकेच्या नेट बँकिंग सुविधा तसेच बँकेच्या विविध व्यवहार व कागदपत्र तसेच सिमकार्ड अवैधरित्या स्वतःच्या ताब्यात ठेवून अवैध मार्गाने मोठ्या आकड्यांच्या रकमा हडप करणारा बोगस नागरिकांच्या खात्यात ही रक्कम वळवून सदर खाते बेकायदा स्वतः हाताळून आर्थिक स्वरूपाची गुन्हेगारी करणारा इसम अजय आणि त्याचा साथीदार रफिक वसई पूर्वेकडील रेंज ऑफिस येथील दुकानात येणार आहे अशी माहिती मिळाली. नमूद बातमीच्या आधारे प्रभारी अधिकारी व पोलिस ठाणे तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी, कर्मचारी यांनी सापळा रचून उत्तर प्रदेश येथील रहिवासी अजय महेशनाथ पंडित आणि कर्नाटकातील रहिवासी रफिक शहापाशा शेख यांचेकडील महेंद्र suv कार नंबर एम एच 48 1212 ताब्यात घेतले सदर ताब्यातून दहा लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली त्यात प्रामुख्याने दोन लॅपटॉप, स्मार्ट फोन, मेमरी कार्ड, सिम कार्ड ,महिंद्रा कार, विविध बँकांचे २५ एटीएम कार्ड, आरोपींनी स्थापलेल्या बोगस रूद्रा सोलुशन कंपनीचे पॅन कार्ड तसेच विविध बँकांची खाते क्रमांकाचे व धारकांचे एकूण ३३ धनादेश पुस्तिका मिळून आले आहेत.

आरोपींकडे केलेल्या चौकशीत खालील ऑनलाइन फ्राँडचे विविध राज्यातील गुन्ह्यांची उकल झाली असून वरील कारवाई पालघरचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर,वसई यांचे सूचनेनुसार उपविभागीय पोलिस अधिकारी वसई उपविभाग यांच्या निगराणीखाली प्रभारी अधिकारी विलास चौगुले त्याचप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर फडतरे, पोलीस हवालदार रवींद्र पवार,मुकेश पवार,मनोज मोरे,पोलीस नाईक राजेंद्र फड, अनिल सोनवणे, सतीश गांगुर्डे,पोलीस शिपाई बालाजी गायकवाड, स्वप्निल तोत्रे ,सचिन बळीद यांनी ही कामगिरी यशस्वी पार पाडली.

पालघर पोलिस दलाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपल्या बँकेचे संबंधी कुठलीही माहिती अनोळखी प्रत्यक्ष अथवा समाज माध्यमवरून,मोबाईलवरून अप्रत्यक्षपणे शेअर करू नये . कुठल्याही वाढीव परतावा देणाऱ्या कपोलकल्पित योजना, जिओ टावर गुंतवणूक योजनांना बळी पडू नये. तसे आढळून आल्यास त्वरित पालघर पोलिसांशी संपर्क साधावा.
 
Top