जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केली प्रकल्पांची पाहणी

सोलापूर (१० सप्टेंबर) - सोलापुरातील दोन प्रकल्पात उत्पादीत होणारा ऑक्सिजन केवळ जिल्ह्यातील वैद्यकीय उपयोगासाठीच राखून ठेवला जाणार आहे. या ऑक्सिजनचे जिल्ह्यातील वितरण अतिशय काटेकोरपणे करा, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.
श्री.शंभरकर यांनी चिंचोळी औद्योगिक वसाहती मधील एल आर इंडस्ट्रीज आणि आर्निकेम इंडस्ट्रीजला भेट देऊन ऑक्सिजन उत्पादन, वितरण याची पाहणी केली. यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पि. शिवशंकर, उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, तहसीलदार जीवन बनसोडे आदी उपस्थित होते.

 संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना     
     श्री.शंभरकर यांनी या दोन्ही प्रकल्पात उत्पा्दित होणारा ऑक्सिजनची क्षमता, ऑक्सिजनचे वितरण, उत्पादनात वाढ करता येईल का याबाबत सविस्तर चर्चा केली. त्याच बरोबर उत्पादकांच्या अडचणी समजून घेतल्या. या दोन्ही प्रकल्पातील उत्पादन आणि वितरण यामध्ये सुसूत्रता यावी यासाठी या दोन्ही प्रकल्पात एक मंडल अधिकारी आणि दोन तलाठी यांची नियुक्ती करावी, अशा सूचना श्री. शंभरकर यांनी दिल्या. या दोन्ही प्रकल्पातील ऑक्सिजन वैद्यकीय व्यतिरिक्त इतर कारणासाठी वापरला गेला किंवा वितरण केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचनाही श्री. शंभरकर यांनी दिल्या.  
      
    जिल्ह्यात सध्या एल.आर. इंडस्ट्रीज आणि आर्निकेम इंडस्ट्रीज येथे ऑक्सिजनचे उत्पादन घेतले जाते.त्याचबरोबर टेंभुर्णी येथील एस.एस. बैग्ज ऐंड फिल्टर्स प्रकल्प सुरु करण्यात आला  आहे.यावेळी आर्निकेम इंडस्ट्रीजचे राहुल आराध्ये, एल आर इंडस्ट्रीजचे शेषगिरी देशपांडे उपस्थित होते.
 
Top