अधिकची मागणी लक्षात घेवून जिल्ह्यात ऑक्सिजनचे उत्पादन सुरु

   पंढरपुर,(संभाजी वाघुले)- सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा पुरेसा साठा आहे.  त्याच बरोबर अधिकची मागणी लक्षात घेवून जिल्ह्यात ऑक्सिजनचे उत्पादन सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती  पालकमंत्री दत्तात्रय भरणे  यांनी दिली.

    पालकमंत्री भरणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणूच्या संसर्गाला रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यानंतर  त्यांनी ही माहिती दिली. बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त पी.शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव आदी उपस्थित होते. 

   श्री.भरणे यांनी सांगितले की,सोलापूर शहर आणि जिल्ह्यात शेजारील जिल्ह्यातून उपचारासाठी रुग्ण येत आहेत. त्यामुळे ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. मात्र जिल्ह्यात दोन प्रकल्पातून ऑक्सिजन उत्पादन होते. त्यांची क्षमता वाढविण्यात येत आहे. त्याचबरोबर टेंभुर्णी औद्योगिक वसाहतीतील बंद असलेला एक प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुरेसा ऑक्सिजन साठा उपलब्ध होईल. याशिवाय पुणे आणि कर्नाटकातूनही ऑक्सिजन आणता येईल का याबाबत प्रयत्न सुरु आहेत. 

महिला आणि मुलांसाठीच्या रुग्णालयाचे कामकाज गतीने करण्यात यावे

    श्री.भरणे यांनी बैठकीत औषधे आणि इतर अनुषांगिक साहित्याची मागणी अगोदरच करा अशा सूचना सहाय्यक अधिष्ठाता डॉ.शुभलक्ष्मी जयस्वाल आणि डॉ.अग्रजा वरेरकर-चिटणीस यांना दिल्या. महिला आणि मुलांसाठीच्या रुग्णालयाचे कामकाज गतीने करण्यात यावे, त्यासाठी आवश्यक निधी मिळविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, अशा सूचना अधीक्षक अभियंता संतोष शेलार यांना दिल्या. 

    श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात शंभर बेडचा आणखी एक कक्ष सुरु करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी श्री.शंभरकर यांना दिल्या.

    सोलापूरच्या विकासाबाबतच्या प्रश्नांबाबत लवकरच स्वतंत्र बैठक घेणार आहे. त्यामध्ये सोलापूर महानगरपा‍लिका, जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन आणि इतर सर्व विभागाशी निगडीत प्रश्नाबाबत व्यापक चर्चा केली जाईल. यामध्ये सर्वांना सहभागी केले जाईल, असे श्री. भरणे यांनी सांगितले. 

    या बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भीमाशंकर जमादार, डॉ.शीतलकुमार जाधव, पोलीस उपायुक्त बापू बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त अभय डोंगरे आदी उपस्थित होते.
 
Top