नवी दिल्ली,PIB Mumbai,२१ सप्टेंबर २०२०-
नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ‘एनआरए’ म्हणजे राष्ट्रीय नियुक्ती संस्थेच्या वतीने सप्टेंबर २०२१ पासून सामाईक पात्रता चाचणी अर्थात ‘सीईटी’ आयोजित करण्यात येईल असे अपेक्षित आहे, अशी माहिती कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन, केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) डॉ.जितेंद्र सिंह यांनी लोकसभे मध्ये एका लेखी उत्तरामध्ये दिली.

सरकारने दि. २८/०८/२०२० रोजी काढलेल्या एका आदेशानुसार एनआरए म्हणजेच ‘राष्ट्रीय नियुक्ती संस्थेची’ स्थापना करण्यात आली आहे. या स्वतंत्र संस्थेमार्फत संगणकाच्या मदतीने व्यावसायिक पद्धतीने भरतीसाठी ऑनलाइन ‘सामाईक पात्रता चाचणी’- सीईटी घेण्यात येणार आहे. यामध्ये ‘ब’दर्जाच्या अराजपत्रित गट, ‘ब’ राजपत्रित गट यांच्या रिक्त स्थानांच्या भरतीसाठी उमेदवारांची निवड करण्यात येईल. केंद्रीय लोक सेवा आयोगाबरोबरच्या चर्चेनंतर या पदांसाठी आयोगामार्फत परीक्षा घेण्याची अट वगळण्यात आली होती. आता एनआरएच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या परीक्षेमुळे सर्व उमेदवारांना नजीकच्या जिल्हा मुख्यालयामध्ये समान व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर भरती प्रक्रियेमध्ये सर्वसमावेशक असे नवीन मानक स्थापन करणे शक्य होणार आहे.

सरकारी क्षेत्रातल्या नोकरीसाठी एनआरएच्या वतीने उमेदवारांची छाननी तसेच लघुसूची तयार करण्यासाठी सीईटी घेण्यात येईल. सध्या हे कार्य कर्मचारी निवड आयोग (एसएससी), रेल्वे भरती मंडळ (आरआरबी), आणि इस्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक निवड (आयबीपीएस)अशा विविध मंडळे, संस्थांच्यावतीने करण्यात येत आहे. एनआरए केवळ उमेदवारांची प्राथमिक छाननी,तपासणी करण्याचे काम करणार आहे. मात्र अंतिम नियुक्ती त्या त्या विशिष्ट विभागाच्या परीक्षा, चाचणीतून करण्यात येईल.उदाहरणार्थ-एसएससी,आरआरबी आणि आयबीपीएस संस्था त्यांच्या आवश्यकता , पात्रता लक्षात घेवून उमेदवारांची निवड करतील. मात्र यासाठी एनआरएच्यावतीने घेतलेल्या सीईटी मध्ये मिळविलेल्या गुणांच्या आधारे उमेदवाराला संबंधित भरती संस्थेमार्फत घेतल्या जाणाऱ्या विशिष्ट परीक्षेला अथवा चाचणीला उपस्थित राहता येईल.

       घटनेतल्या अनुच्छेद ८ नुसार उमेदवारांना प्रादेशिक भाषेत परीक्षा देणे शक्य व्हावे, यासाठी एनआरएच्यावतीने भाषा तज्ज्ञ चिन्हीत करण्यात येणार असून सीईटी परीक्षेसाठी प्रश्न बँक, नमूना प्रश्नपत्रिका यांचा सर्व प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद करण्यात येणार आहे. प्रादेशिक भाषेमध्ये परीक्षा देण्याचा पर्याय निवडणारे पुरेसे उमेदवार असतील तर त्यांच्यासाठी ही सुविधा असणार आहे.
 
Top