प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरो, पुणे व पत्र सूचना कार्यालय, मुंबई तर्फे वेबिनारचे आयोजन

अहमदनगर,१६ /०९/२०२० ,PIB Mumbai - राष्ट्रीय पातळीवर सप्टेंबर महिना हा 'राष्ट्रीय पोषण महिना' म्हणून साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट महिन्याच्या 'मन की बात' कार्यक्रमात 'राष्ट्रीय पोषण माह अभियाना'चा उल्लेख करून मुलांचे सामर्थ्य व क्षमता यामध्ये आहाराची सर्वात महत्वपूर्ण भूमिका असल्याचे म्हटले होते, व जनभागीदारीतून भारताला कुपोषण मुक्त करता येईल, असे आवाहन केले होते. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, अहमदनगर, प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरो (महाराष्ट्र-गोवा राज्य), पुणे व पत्र सूचना कार्यालय (पश्चिम विभाग), मुंबई, तसेच महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आज एका वेबिनारचे आयोजन करण्यात आले.

आहारातून साधलेले आरोग्य, हा जीवनाचा पाया: तज्ज्ञांनी केले नमूद

'राष्ट्रीय पोषण माह: घराघरात पोषण उत्सव - सुदृढ बाळासाठी पोषण आहार' विषयावरील या वेबिनारमध्ये संध्या नगरकर, सहाय्यक आयुक्त, एकात्मिक बालविकास योजना, महाराष्ट्र शासन, संजय कदम, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालविकास विभाग,जिल्हा परिषद अहमदनगर, वैशाली कुकडे,बालविकास प्रकल्प अधिकारी, अहमदनगर, सोपान ढाकणे, बालविकास प्रकल्प अधिकारी, अहमदनगर, व योगेश जोशी, रिलायंस फाउंडेशन,अहमदनगर या सर्वांनी मार्गदर्शन केले.
 
Top