पुराने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

पंढरपूर,(प्रतिनिधी) - पंढरपूर शहरासह तालुक्या मध्ये चालू असलेल्या मुसळधार पाऊस, वारा, अतिवृष्टीमुळे तालुक्यातील बऱ्याच गावातील नदी, नाले, ओढे शंभर टक्क्यांहून जास्त भरल्यामुळे आलेल्या पुराने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर काहींनी आपले सर्वस्व गमावले आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे,त्यांना शासनाकडून त्वरित रोख रकमेची मदत मिळावी म्हणून सुदर्शन रायचंद खंदारे यांनी पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याकडे मागणी केली आहे.


पंढरपूर शहरासह तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंढरपूर तालुक्यातील बऱ्याच गावात मोठा महापूर आला आहे. या पुरातील पाण्याचा वेग एवढा प्रचंड आहे की या पाण्याने त्याच्या रस्त्यात येणारे छोटे मोठे बंधारे, दोन गावांना जोडणारे पूल वगैरे वाहून नेले आहे .


या पुराच्या पाण्याने शेतीचे,घराचे,शेतीतील पिकांचे,पशुधनाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.अचानक रात्रीच्यावेळी पावसाचे पाणी नदी,नाले,ओढ्याच्या महापुराच्या स्वरूपात घरात घुसल्याने वाड्या वस्त्यांवरील लोकांनी घरातील पसारा तसाच टाकून आपले सर्वस्व सोडून स्वतःचा आणि आपल्या लेकराबाळांचा जीव वाचविला.यात काही ठिकाणी पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनीही आपल्या परीने लोकांचे जीव वाचवले.


या सर्व धावपळीमध्ये शेतकऱ्यांनी आपले सर्वस्व गमावले आहे. यामुळे बाधित कुटुंबे उघड्यावर आले आहे. शासकीय नियमानुसार पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो. त्यामुळे पंचनामा होतेवेळी अथवा त्यापूर्वी बाधित शेतकऱ्यांना तात्काळ आणि रोख स्वरूपाची मदत मिळणे आवश्यक आहे,अशी मागणी सुदर्शन रायचंद खंदारे यांनी प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याकडे केली आहे.
 
Top