अंत्योदय दिवसाच्या निमित्ताने आज दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना (डीडीयू- जीकेवाय) वर्धापन दिवस साजरा करण्यात येणार- ‘ कौशल से कल बदलेंगे’

नवी दिल्ली,PIB Mumbai,२४/०९/२०२०-
पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त २५ सप्टेंबर २०१४ हा दिवस अंत्योदय दिवस म्हणून जाहीर करण्यात आला. याच दिवशी ग्रामीण विकास मंत्रालयाने आपल्या आजिविका कौशल्य या कौशल्य विकास कार्यक्रमाची पुनर्रचना करून दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना( डीडीयू- जीकेवाय) हा कार्यक्रम सुरू केला. अधिक व्याप्ती, पोहोच आणि दर्जा या तीन बाबींवर याचा भर होता. हे करताना ग्रामीण विकास मंत्रालयाने गेल्या १५ वर्षात कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाची अंमल बजावणी करताना प्राप्त झालेल्या ज्ञानाचा वापर केला.

डीडीयू-जीकेवाय मागणीनुसार चालणारा रोजगाराशी संबंधित कौशल्य उपक्रम

डीडीयू-जीकेवाय हा कार्यक्रम आता एक मागणी नुसार चालणारा रोजगाराशी संबंधित कौशल्य उपक्रम बनला असून ग्रामीण भागातील गरीब युवकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रोजगार संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे हे अंत्योदय मोहिमेचे लक्ष्य आहे. याच बोधवाक्याच्या दिशेने ग्रामीण विकास मंत्रालय भारतातील सर्व पात्र ग्रामीण युवकांपर्यंत पोहोचण्यासाठी काम करत आहे. या काळात डीडीयू- जीकेवाय ग्रामीण युवकांसाठी बाजार संबंधित कौशल्य आणि शाश्वत रोजगार संधी या दोन्ही गोष्टी पुरवणारा एक प्रभावी ग्रामीण विकास उपक्रम बनला आहे. या जागतिक महामारीच्या काळात ग्रामीण विकास मंत्रालय हा शुभ दिवस सर्व राज्ये/ केंद्रशासित प्रदेश यांच्यासोबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून साजरा करत आहे. केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री आणि कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती इतर राज्य सरकारांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. डीडीयू- जीकेवायच्या या आश्चर्यकारक प्रवासाच्या उत्सवामध्ये सहभागी व्हावे अशी सर्वांना विनंती करण्यात येत आहे.
 
Top