ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांची जयंती

       (२५ सप्टेंबर,१९३१ - १० मे २०१५)

   आ.बिंदुमाधव जोशी उपाख्य तीर्थरुप नाना हे अखिल भारतीय ग्राहक पंचायत या राष्ट्रीय स्तरा वरील ग्राहक संघटनेचे संस्थापक होते. ग्राहक संरक्षण कायदा निर्मितीमध्ये त्यांचा सिंहांचा वाटा होता.त्यामुळे त्यांना भारतीय ग्राहक संरक्षण कायद्याचे जनक संबोधले जाते.

  तीर्थरुप बिंदुमाधव जोशी यांचा जन्म २५ सप्टेंबर १९३१ रोजी अनंत चतुर्दशीला झाला.त्यांचे वडील बटुकभैरव जोशी हे लोकमान्य टिळकांचे अंगरक्षक होते.त्यांचा प्रभाव असल्यामुळे तीर्थरुप बिंदुमाधव जोशी यांनी तालमीत जाऊन बलोपासना केली होती. पुण्यातील स.प. महाविद्यालयातून त्यांनी बी.ए.पदवी संपादन केली.१९५४ मध्ये दादरानगर हवेली येथील पोर्तुगीज राजवटीच्या विरोधात झालेल्या सशस्त्र उठावात भाग घेतला होता. पुढे ते गोवा मुक्तिसंग्राम लढ्यात सहभागी झाले होते. देशभरातील ग्राहकांना संघटित करण्याच्या उद्देशाने १९७४ मध्ये त्यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. सर्वसामान्य ग्राहकाला त्याचे हक्क मिळवून देणारी ही चळवळ देशभर फोफावली.

बिंदुमाधव जोशी यांच्या अथक प्रयत्नांमुळे ग्राहक संरक्षण कायदा संमत

कै.बिंदुमाधव जोशी यांच्या अथक प्रयत्नांमुळे १९८६ मध्ये ग्राहक संरक्षण कायदा संमत करण्यात आला.या सोबतच त्यांनी प्रवासी ग्राहकां साठी महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाची स्थापनाही १९८९ मध्ये केली होती.महाराष्ट्र राज्यामध्ये १९९५ मध्ये ग्राहक कल्याण उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली होती. कॅबिनेट दर्जा असलेल्या या समितीचे अध्यक्षपद आ.बिंदुमाधव जोशी यांनी भूषविले होते.

भारतातील ग्राहक चळवळीचे प्रणेते ग्राहकतीर्थ आ.बिंदुमाधव जोशी उपाख्य तीर्थरुप नानांना ८९ व्या जयंती निमित्त कोटी कोटी वंदन!...
गुरुनाथ बहिरट, संपादक
डॉ. विजय लाड, सहसंपादक
डॉ.राजेश फडे, उपसंपादक
ग्राहकतीर्थ
 
Top