पंढरपूर
,२४/०९/२०२०- कोरोना रुग्णांसाठी तयार केलेल्या पंढरपूर नगरपालिकेच्या भक्तीसागर मधील (६५ एकर) कोविड केअर सेंटरमधील साहित्याच्या चोऱ्या होत असल्याचा धक्कादायक प्रकार दिसून आला, विशेष म्हणजे येथील महागड्या ऑक्सिजन पाईपदेखील तोडून त्या चोरून देण्याचाही प्रयत्न झाला आहे.आज सकाळी येथील काही ग्रामस्थांनी या साहित्यासह चोरांना पकडल्याने हा प्रकार लक्षात आला आहे .
येथे प्रशासनाच्यावतीने योगा आणि प्राणायाम यांचे वर्गही चालवले जातात.परंतु कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची नियुक्ती आणि पुरेशी वर्दळ नसल्या मुळे चोरट्यांनी कोवीड सेंटरवर लक्ष केंद्रित केले आहे.

आज सकाळीच येथे साहित्याची चोरी करून बाहेर जात असताना या भागात फिरायला आलेल्या नागरिकांनी चोरांना रंगहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले कारण या चोरांच्या हातामध्ये प्लंबिंगच्या वस्तू दिसल्या.त्यांना पकडून या वस्तू बद्दल विचारणा केली असता त्यांना योग्य उत्तरे देता न आल्याने तात्काळ तालुका पोलिस ठाण्याशी संपर्क साधून त्या चोरांना पोलिसांच्या ताब्यात दिले .

कोट्यावधी रुपये खर्च करून येथे प्रशासनाच्या वतीने सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आले असल्या तरी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने येथील अवस्था विचार करायला लावणारी आहे.येथे कंत्राटी कामगार नेमण्यात आलेले आहेत परंतु ते पूर्णवेळ उपस्थित नसतात. हा सगळा प्रकार धक्कादायक असून प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देण्याची गरज नागरिक आणि रूग्ण व नातेवाईकांकडून व्यक्त होत आहे .
 
Top