आठ दिवसात पुतळ्यासाठी जागा देण्याचे प्रशासनाचे आश्‍वासन

पंढरपूर,१९/०९/२०२० - येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे (lokshahir annabhau Sathe statue )यांच्या नियोजित पुतळ्याच्या जागेसंदर्भात गुरुवारी झालेल्या वादानंतर प्रशासनाने बोलाविलेल्या बैठकीमध्ये पुतळ्यासाठी जागा निश्चित करण्यात आली असून आठ दिवसात पुतळ्यासाठी जागा खुली करून देणार असल्याचे आश्वासन नगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आले. यामुळे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या बैठकीसाठी नगरपालिका मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सागर कवडे, पुतळा समितीचे अध्यक्ष नागेश यादव,उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे,ज्येष्ठ नेते दिलीप देवकुळे,दुर्योधन यादव, माजी नगरसेवक अंबादास वायदंडे, महेश साठे, नगरसेवक कृष्णा वाघमारे,किशोर खिलारे,ॲड. बादल यादव,धनंजय वाघमारे,अमित आवघडे आदि उपस्थित होते.


नियोजित जागा मिळेपर्यंत प्रतिमा हलवणार नाही - नागेश यादव
नगरपालिका प्रशासनाकडून घेतलेल्या बैठकीत दिलेल्या आश्वासनानुसार लवकरात लवकर निश्चित केलेली जागा प्रशासनाने खुली करून देईपर्यंत प्रतिमा हलविण्यात येणार नाही. विलंब झाल्यास पुढील काळात आंदोलन करणार असल्याचा इशारा पुतळा समितीचे अध्यक्ष नागेश यादव यांनी प्रशासनास दिला आहे.
पंढरपूर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्याबाबतची प्रक्रिया अनेक वर्षांपासून सुरू आहे.पुतळा उभारण्यात येणार असलेल्या लहुजी वस्ताद चौक येथील नियोजित जागेत अनेक वर्षांपासून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा बसविण्यात आली आहे. ही प्रतिमा सांगोला-पंढरपूर या सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे काढण्यावरून गुरुवारी झालेल्या वादानंतर पंढरपूर नगरपरिषदेत प्रशासनाकडून बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या नियोजित पुतळ्यासाठी जागा मिळेपर्यंत लहुजी वस्ताद चौकातील प्रतिमा हलवण्यात येणार नसल्याचे समाज बांधवांकडून प्रशासनास सुनावण्यात आले. यावेळी प्रशासन आणि समाजबांधवांमध्ये झालेल्या चर्चेत जागा निश्चित करण्यात आली असून आठ दिवसांमध्ये संबंधितांना नोटिसा बजावून पुतळ्यासाठी जागा खुली करून देणार असल्याचे आश्वासन नगर पालिका प्रशासनाकडून समाज बांधवांना देण्यात आले. यानंतर हा वाद मिटला असला तरी लवकरात लवकर जागा न मिळाल्यास आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा पुतळा समितीचे अध्यक्ष नागेश यादव यांनी प्रशासनास दिला आहे.
 
Top