श्री दिगंबर जैन सिद्धक्षेत्र कुंथलगिरी येथे जलसंधारण अंतर्गत शेततळे (पाणी साठवण तलाव) स्तुत्य उपक्रम.....

कुंथलगीरी,दिनांक २० ऑगस्ट २०२० - श्री दिगंबर जैन सिद्धक्षेत्र कुंथलगीरी संचालित भक्त निवास,विद्यार्थी वस्तीगृह,पशु पक्षी, फळबागा, विविध प्रकारच्या झाडांच्या वाढीकरीता तसेच शेतीसाठी वर्षभर सातत्याने व मुबलक पाणी पुरवठा अखंड व्हावा या हेतूने जलसंधारण अंतर्गत शेत तळे (पाणी साठवण तलाव) प्रकल्प आज पूर्ण झाला.

अमीर खान संचालित पाणी फाउंडेशन विकास सेवा मंडळ,बिदालचे कार्यकारी अध्यक्ष हनुमंतराव नामदेव जगदाळे,बिदाल,ता.माण,जिल्हा सातारा यांनी सखोल अभ्यास व योग्य नियोजन करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली व बिदाल येथील त्यांचे सर्व सहकारी यांच्या सहकार्याने या तलावाचे बांधकाम यशस्वीपणे पूर्ण केले.

या शेत तळ्याची पाणी साठवण क्षमता ६८ लाख ७५ हजार २८० लिटर असून शेततळ्याची लांबी ५४ मीटर, रुंदी ४४ मीटर आहे व खोली सात मीटर आहे. शेततळ्यामुळे श्री दिगंबर जैन सिद्धक्षेत्र कुंथलगीरी या संस्थेसाठी पाण्याची गरज पूर्ण क्षमतेने कायमची भागवली जाणार आहे.

अतुलकुमार शहा (सराफ)बारामती,शितल दोशी बारामती,पुणे यांनी शेततळे स्वखर्चाने बांधले 

प. पू. शांतीसागर महाराजांच्या पासष्टाव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अतुलकुमार जिनदत्त शहा (सराफ)बारामती व शितल अभयकुमार दोशी (ढाकाळकर) बारामती, पुणे यांनी हे शेततळे (पाणी साठवण तलाव) स्वखर्चाने बांधून श्री दिगंबर जैन सिद्धक्षेत्र कुंथलगिरी या ट्रस्टकडे आज गुरुवार, दिनांक २० ऑगस्ट २०२० रोजी हस्तांतरित केले. या शेततळ्याच्या बांधकामांमुळे सिद्धक्षेत्राची पाण्याची गरज कायमची भागवली जाणार आहे.जैन मंदिरांच्या धार्मिक क्षेत्रामध्ये तयार होणारा अशा प्रकारचा शेत तळ्याचा पहिलाच प्रकल्प आहे.

श्री दिगंबर जैन सिद्धक्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त मंडळाच्या सर्व विश्वस्तांनी अतुलकुमार जिनदत्त शहा (सराफ) बारामती व शितल अभयकुमार दोशी (ढाकाळकर) बारामती, पुणे यांचे आभार व्यक्त केले असून समाजोपयोगी कार्य व सेवा केल्याबद्दल संस्थेच्या विश्वस्त मंडळाने कौतुकही केले. विश्वस्त मंडळाच्या सर्व सदस्यांनी एकमताने या शेततळ्यास "वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे तलाव" असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला आहे .
 
Top