होम क्वारंटाइन व्यक्ती नियमभंग करत असल्याच्या तक्रारी -डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी

कोल्हापूर - राज्यातील करोनाचा कहर काही थांबताना दिसत नाही.मुंबईसह राज्यातील पोलिस दलात तसेच वैद्यकीय क्षेत्रात करोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. शुक्रवारी दिवसभरात करोनामुळे राज्यात अकोला, बुलडाणा आणि भुसावळमध्ये तीन डॉक्टरांचा मृत्यु झाल्याने खळबळ उडाली आहे. तर पोलिस दलात करोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत आहे.त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.कारण लॉकडाऊनच्या काळात पोलिसांवर सर्वाधिक जबाबदारी होती .महाराष्ट्रातील करोनानं मृत्यू पावलेल्या पोलिसांची संख्या १५३ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात पाच पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

  एवढे असले तरीही होम क्वारंटाइन असलेल्या व्यक्ती नियमभंग करत असल्याच्या अनेक तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. गृहविलगीकरण अथवा अलगीकरण केलेल्या व्यक्ती अलीकडे सर्रास बाहेर फिरताना आढळत असून नियमाचे भंग करत आहेत. यामुळे करोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. 

क्वारंटाइनचे नियम पाळा,अन्यथा फौजदारी गुन्हा आणि ५ हजार रुपये दंड

 त्यामुळे कोल्हापुरात पालिका आयुक्तांनी कठोर पाऊल उचलले असून अशा व्यक्तीला व त्याच्या कुटुंबाला मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.गृहविलगीकरण (होम क्वारंटाइन) अथवा अलगीकरण केलेल्या व्यक्तीने नियमभंग केल्यास त्याच्यासह कुटुंबातील सर्वांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबरोबरच पाच हजार रुपये दंड करण्याचा आणि संबंधित व्यक्तीस कोविड केंद्रात पाठवण्याचा आदेश कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिला आहे.

 करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.करोनाबाधित रुग्णांची त्यांच्या घरी राहण्याची स्वतंत्र सोय उपलब्ध असल्यास त्यांच्या कडून हमीपत्र घेवून त्यांचे घरी विलगीकरण करण्यात येते. तसेच करोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या व बाहेर गावावरुन येणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या घरी राहण्याची स्वतंत्र सोय असल्यास हमीपत्र घेवून त्यांना घरी अलगीकरण केले जाते. परंतु, हमीपत्रातील अटींचे उल्लंघन करुन गृह विलगीकरण आणि अलगीकरणातील व्यक्ती घराबाहेर फिरत असताना दिसत आहेत.यामुळे या आदेशाचे उल्लंघन केल्यास अशा व्यक्तींना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात यावे. संबंधित व्यक्तींवर ५ हजार रुपये दंडात्मक कारवाई करावी. ज्या कुटुंबातील अशी व्यक्ती असेल त्या कुटुंबातील सर्व व्यक्तीसुद्धा साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यातील तरतुदीनुसार फौजदारी व दंडात्मक कारवाईसाठी पात्र राहतील,असेही कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी म्हटले आहे.
 
Top