भाविकांकडून विसर्जनासाठी दान घेतलेल्या गणेशमूर्ती पुन्हा विकण्याचे षडयंत्र ?

पुणे - गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सव आला की,पुणे महानगरपालिका प्रशासन पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली सातत्याने काही ना काही धर्मद्रोही उपक्रम राबवत आहे. विसर्जनासाठी कृत्रिम हौद या धर्मविरोधी संकल्पनेनंतर ‘अमोनियम बायकार्बोनेट’च्या केमिकलमध्ये विसर्जन आरंभले.यंदाच्या वर्षी कोरोना महा मारीच्या पार्श्‍वभूमीवर कृत्रिम हौद कचरापेट्यां पासून बनवल्याचे उघड झाले.संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून पालिकेने हे मान्य केले. आता तर पालिकेने धर्मद्रोहाची परिसीमा गाठत ‘मूर्तीदान’ उपक्रमाअंतर्गत भाविकांकडून विसर्जनासाठी दान घेतलेल्या मूर्तींची पुनर्विक्री करण्यासाठी अनुमती देत सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मूर्तींची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात असल्याचे उघड झाले आहे. किती मूर्ती दान मिळाल्या, किती मूर्ती विकल्या, त्यातून मिळालेला पैसा कुठे आणि कोण वापरणार, या सर्व गोष्टी पालिकेच्या आवाहनावर विश्‍वास ठेवून त्यांना विसर्जनासाठी मूर्तीदान करणार्‍या भाविकांपासून का लपवल्या,असे अनेक प्रश्‍न यातून उपस्थित होतात.हा गणेश भक्तांच्या धार्मिक भावनांशी खेळ करणारा, तसेच भाविकांची आणि मूर्तीकारांची घोर फसवणूक करणारा ‘मूर्तीदान घोटाळा’च आहे,एकीकडे पालिकेने नदीपात्रात विसर्जन करण्यास जबरदस्तीने बंदी लादली आहे, तर दुसरीकडे याचा गैरफायदा घेत मोठ्या प्रमाणात मूर्तीदान घेऊन सामाजिक संस्थांकरवी अवैधपणे त्याच्या विक्रीचा घाट घातला आहे.पालिका प्रशासन आणि सामाजिक संस्था यांना अशा प्रकारे विसर्जनासाठी दान घेतलेल्या मूर्ती परस्पर विकण्याचा अधिकार आहे का ?, या विक्रीत पालिकेच्या अधिकार्‍यांचे काही परसेंट ठरले आहे का ?, विसर्जनासाठी दान केलेल्या मूर्ती विकून पुढील वर्षी पुन्हा त्यांची प्रतिष्ठापना करता येते का,तसेच हे धर्मशास्त्र दृष्ट्या योग्य आहे का ?,असा घणाघात हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत केला. 

   यावेळी त्यांनी पालिका प्रशासनाचा पत्रव्यवहार आणि मूर्तिदान घेणार्‍या ‘स्प्लेंडीड व्हिजन’ या गैरसरकारी संस्थेच्या पदाधिकार्‍यांचे ‘स्टिंग’ व्हीडीओही पत्रकार परिषदेत सादर केले. या पत्रकार परिषदेला गणेश मूर्तीकार संघटनेचे अध्यक्ष प्रवीण बावधनकर, केशव कुंभार, गार्गी फाऊंडेशनचे  विजय गावडे, राष्ट्र निर्माण संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र युवा संपर्क प्रभारी दयावान कुमावत आणि हिंदु जनजागृती समितीचे मिलिंद धर्माधिकारी हे उपस्थित होते.
 
Top