महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षा कोरोनामुळे जिल्हा मुख्यालय केंद्रावर घेण्यात यावी-आ.डॉ.नीलम गोऱ्हे
 पुणे ,दि.१५ ऑगस्ट, २०२०- महाराष्ट्रमध्ये सध्या कोविड १९ ची रुग्णसंख्या मोठया प्रमाणात वाढत आहे.दि.१४ ऑगस्ट २०२० च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग परिपत्रक नुसार दि.२० सप्टेंबर, २०२० रोजी नियोजित परीक्षेसाठी केवळ पुणे जिल्हा निवडलेल्या विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांच्या मूळ पत्त्याच्या महसूल विभागीय ठिकाणी परीक्षा केंद्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोव्हीड-१९ मुळे सर्व जिल्हाधिकारी यांनी आंतरजिल्हा बंदी घातली आहे. प्रवासास अत्यंत महत्त्वाचे कारण असेल तरच परवानगी मिळते. तसेच पुणे, मुंबई, नाशिक,औरंगाबाद नागपूर ही विभागीय आयुक्त मुख्यालय शहरे ही हॉट स्पॉट आहेत. या ठिकाणा हून येणाऱ्या नागरिकाला विलगीकरण केले जाते. तसेच या शहरात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी परीक्षेला येणार आहेत त्यामुळे या शहरातील प्रशासकीय यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताणही येणार आहे. बहुतांश विद्यार्थी हे गरीब घराण्यातील असतात .मोठ्या शहरांमध्ये राहण्याची त्यांची व्यक्तिगत सोयही नसते व त्यामुळे बाहेर राहण्याचा खर्च परवडत नाही. यामुळे राज्यसेवा आयोगाच्या परीक्षा ह्या जिल्हा पातळीवरील केंद्रात घेण्याची मागणी शिवसेना प्रवक्त्या आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आयोगाच्या अध्यक्षांना दिलेल्या पत्रात म्हंटले आहे.

   महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षेची केंद्रे ही जिल्हा मुख्यालायामध्ये ठेवणे योग्य होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या मूळ पत्ता असेल त्याच जिल्ह्यात केंद्र उपलब्ध करून घ्यावे. दि.१४ ऑगस्टच्या परिपत्रकामध्ये केवळ पुणे जिल्ह्यात परीक्षा केंद्र निवडलेल्या विद्यार्थ्यांचे केंद्र बदलून मिळणार आहे. परंतु ज्या विद्यार्थांनी मुंबई सेंटर निवडले आहे त्यांना या परिपत्रकाचा लाभ होणार नाही. त्यामुळे सरसकट विद्यार्थ्यांना दि. २० सप्टेंबर २०२० ची राज्यसेवा पूर्व परीक्षा ही जिल्हा मुख्यालय केंद्रावर घेणेबाबत आवश्यक कार्यवाही करावी, अशी विनंती आ.डॉ.गोऱ्हे यांनी केली आहे.
 
Top