वैद्यकीय सेवा न देणाऱ्या सर्व संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा

पंढरपूर - पंढरपूर शहरातील अपेक्स, जनकल्याण, गॅलेक्सी, गणपती आणि विठ्ठल हॉस्पिटलमध्ये covid-19 रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. कोरोनाच्या प्रसारामुळे वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर,नर्सेस, सिस्टर व इतर कर्मचाऱ्यांनी विविध कारणांमुळे वैद्यकीय सेवा देण्यास असमर्थता दाखवली आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत वैद्यकीय सेवा न देणाऱ्या सर्व संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्यास व हॉस्पिटलमध्ये कामावर हजर राहण्यास नकार दिल्यामुळे एक डॉक्टर, नर्स व ब्रदर आणि सुरक्षा रक्षक अशा ९ जणांविरोधात पंढरपूर शहर पोलिसात भ दं वि १८८, आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंढरपूर येथील नायब तहसीलदार विजय जमादार यांनी शहर पोलिसात ५ ऑगस्ट रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार डॉक्टर श्रेया जाधव, साहिल रणदिवे, मेहुल मेढा ,नंदकुमार जाधव, रोहिणी चंदनशिवे, संध्याराणी गालफाडे, सागर ननवरे, दत्तात्रय व्हानसळे,पवन हेगडे या ९ जणांविरोधात गॅलेक्सी आणि अपेक्स हॉस्पिटल येथे सिस्टर म्हणून काम करीत काम करीत असताना ०१ ऑगस्टपासून कामावर गैरहजर राहिले आहेत. 

    प्रांताधिकारी यांच्या आदेशाचा भंग

     कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांतर्गत गॅलेक्सी आणि अपेक्स हॉस्पिटल येथे वैद्यकीय सेवा देण्यासाठी कामावर हजर रहावे अशी सूचना करण्यात आली होती. मात्र ०१ ऑगस्टपासून ०५ ऑगस्टपर्यंत हे ९ कर्मचारी हजर राहिले नाहीत. प्रांताधिकारी यांच्या आदेशाचा भंग केला. हॉस्पिटलला बोलावूनही कामावर हजर झाले नाहीत त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल मच्छींद्र राजगे पुढील तपास करीत आहेत.
 
Top