लोकमान्य टिळक अखिल भारतीय पातळीवरचे पुढारी होते : किशोर बेडकिहाळ

फलटण,जि.सातारा - लोकमान्य टिळकांच्या कार्याचा प्रतिगामी आणि पुरोगामी व्यक्तीमत्त्व म्हणून विचार न करता त्यांचे शिक्षण, सहकार, अर्थ, शेती आणि स्वातंत्र्य लढ्यातील योगदान संयुक्तरित्या समजून घेणे आवश्यक आहे. त्यांच्या विस्तृत कार्यामुळे ते अखिल भारतीय पातळीवरचे पुढारी होते, असे मत ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी व्यक्त केले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे मानवतेचे पुजारी होते : प्रा.मिलिंद जोशी

दु:ख आणि यातनांच्या विदारकेतून अजरामर साहित्य निर्माण करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यात मानवतेचे मूल्य कायम अग्रस्थानी ठेवले. साहित्य व शाहिरीच्या माध्यमातून सोशित समाजासाठी समतेची लढाई लढणारे अण्णाभाऊ साठे हे मानवतेचे पुजारी होते, असे मत प्रसिद्ध वक्ते व साहित्यिक प्रा.मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी व असंतोषाचे जनक ‘लोकमान्य टिळक’ यांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त व साहित्यरत्न ‘लोकशाहीर’ अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित केलेल्या ऑन लाईन व्याख्यान कार्यक्रमात ‘लोकमान्य टिळक : व्यक्ती आणि कार्य’ या विषयावर किशोर बेडकिहाळ तर ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची साहित्यसंपदा’ या विषयावर प्रा.मिलिंद जोशी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ, कार्यकारी विश्‍वस्त विजय मांडके यांची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय मनोगतात रविंद्र बेडकिहाळ म्हणाले, बाळशास्त्री जांभेकरांनी ‘दर्पण’ या वृत्तपत्राच्या माध्यमातून मराठी वृत्तपत्रसृष्टीचा शुभारंभ केला. लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा या वृत्तपत्रांच्या माध्यमातून मराठी पत्रकारितेला स्वातंत्र्य चळवळीचे अधिष्ठान दिले. लोकमान्यांच्या पत्रकारितेने भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक स्वाभिमानी मानदंड म्हणून काम केले. त्यांची पत्रकारिता आजही प्रेरणादायी आहे. अण्णाभाऊ साठे यांनी स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात मोठ्या प्रमाणावर लोकजागृती केली. गाणी, कवने, पोवाडे यांच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय प्रश्‍नांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले. आपले विचार, कार्य व प्रतिभा यांच्या साहाय्याने लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करुन देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे ते ‘लोकशाहीर’ होते, असेही बेडकिहाळ यांनी यावेळी सांगितले.

    आभार विजय मांडके यांनी मानले.कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार दिनकर झिंब्रे, साहित्यिक विलास वरे, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे विश्‍वस्त सौ.अलका बेडकिहाळ, गजानन पारखे, अमर शेंडे, रोहित वाकडे, डॉ.विद्येश गंधे आदींसह पत्रकारिता व साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
 
Top