स्पर्धा परीक्षेत इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना अधिक संधी - आय.ए.एस.राहुल चव्हाण

पंढरपूर- ‘युपीएससी स्पर्धा परीक्षा देण्याच्या हेतूने पुण्यातील ॲकॅडमीमध्ये प्रवेश घेतला.पदवी शिक्षण घेत असतानाच सीबीएससी व एनसीई आरटीच्या पुस्तकांच्या अभ्यासावर भर दिला. पुढे अधिक अभ्यास करण्यासाठी दिल्लीला गेलो व दोन परीक्षा तेथूनच दिल्या परंतु अपेक्षित यश आले नाही. तरीपण दुःखी, निराश न होता झालेल्या चुका दुरुस्त करायचे ठरवून पुण्यात येऊन पुन्हा प्रयत्न सुरु केले. भूतकाळात झालेल्या चुका समजून घेतल्याने पुढील अभ्यास योग्य दिशेने सुरू केला. त्यामुळेच आज यशस्वी झालो. युपीएससी स्पर्धा परीक्षेच्या इंटरव्यूसाठी खूप तयारी केली होती. एकंदरीत अभ्यासातून एक गोष्ट लक्षात आली की स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याची इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना अधिक संधी असते. डॉ. रोंगे सर हे लहानपणापासूनच माझे आदर्श होते. त्यामुळे त्यांच्या सांगण्याने पुढील शिक्षण हे कवठेकर शाळेत पूर्ण केले. ’ असे प्रतिपादन नुकतेच आय.ए. एस. उत्तीर्ण झालेले अधिकारी पंढरपूर तालुक्यातील खर्डीचे राहुल चव्हाण यांनी स्वेरीला सदिच्छा भेट दिली त्यावेळी केले.

नूतन आय.ए.एस.अधिकारी राहुल चव्हाण यांची स्वेरी अभियांत्रिकीला सदिच्छा भेट

राहुल चव्हाण यांचा सत्कार संस्थेचे स्वेरीचे अध्यक्ष नामदेव कागदे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रा.सचिन गवळी यांनी प्रास्ताविक केले तर संस्थेचे संस्थापक सचिव व इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी पाहुण्यांना सर्वांची ओळख करून दिली.

     आभार प्रदर्शनात स्वेरीचे माजी संस्थापक अध्यक्ष डॉ.अरुण गायकवाड म्हणाले की ‘सध्याची तरुण पिढी वाया गेलेली आहे असे आपण म्हणतो परंतु तरुण पिढी किती महान कार्य करू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे राहुल चव्हाण आहेत.’

यावेळी कल्याण चव्हाण, समाधान गाजरे, स्वेरीचे विश्वस्त एच.एम.बागल,बी.डी.रोंगे, प्रा.सुरज रोंगे, डॉ.स्नेहा रोंगे, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
 
Top