साखर कारखाने सुरु करण्यासाठी नियोजन करा - पालकमंत्री दत्तात्रय भरणे

  शेळवे,(संभाजी वाघुले)- सोलापूर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांचा यंदाचा गळीत हंगाम सुरु करण्यासाठी नियोजन करा, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिल्या.

जिल्ह्यातील शेती, पाऊस, खते आणि पीक कर्ज वाटप याबाबतचा आढावा श्री.भरणे यांनी आज घेतला. त्यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासनाला या सूचना दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे,पोलीस आयुक्त अंकुश शिंदे,जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर,महापालिका आयुक्त पी. शिवशंकर,पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार आदी उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारभी श्री.बिराजदार यांनी जिल्ह्या तील पाऊस,खरिपाच्या पेरण्या,खतांची उपलब्धता याबाबत माहिती दिली. चांगला पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पेरण्या झाल्या आहेत. सरासरी पेरणी क्षेत्र सुमारे २ लाख ३४ हजार हेक्टर आहे. मात्र यावेळेला आतापर्यंत ३ लाख ६८ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे, असे सांगितले.

यावर उसाखालील क्षेत्र पाहता साखर कारखाने सुरु करण्याचे नियोजन करा.यासाठी जिल्हा प्रशासन,कृषी विभाग,प्रादेशिक साखर सहसंचालक,सहकार विभाग यांनी एकत्रित नियोजन करावे.ज्या साखर कारखान्यासमोर समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जावेत,असे श्री. भरणे यांनी सांगितले.

        पीककर्ज वाटपाला गती द्या

शेतकऱ्यांना खतांची उपलब्धता वेळेत होईल याकडे लक्ष द्या.पीककर्ज वाटपाला गती द्या. राष्ट्रीयकृत बँकाचे कर्ज वाटप कमी झाले आहे. त्यांची बैठक घेवून पीककर्ज वाटप वाढेल यासाठी प्रयत्न करा,असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी महसुल आणि पोलीस विभागाने एकत्रित प्रयत्न करावेत. त्याचबरोबर ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक वाढविण्यासाठी प्रयत्न करा, असेही श्री.भरणे यांनी सांगितले. 

  बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त पंकज जावळे, जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासक शैलेश कोथमिरे, सरव्यवस्थापक किसन मोटे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत नाशिककर, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, कृषी उपसंचालक रवींद्र माने,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भीमाशंकर जमादार, महापालिका आरोग्य अधिकारी डॉ.शीतलकुमार जाधव आदी उपस्थित होते.
 
Top