रॅपिड ॲटिजेन रॅपिड टेस्ट मोहिमेतंर्गत
तीन हजार नागरिकांची तपासणी-प्रांताधिकारी सचिन ढोले

         पंढरपूर-दि.११/०८/२०२०- तालुक्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी तालुका प्रशासनाने युध्द पातळीवर उपाययोजना केल्या आहेत.याच अतंर्गत दि.०७/०८/२०२० ऑगस्टपासून शहरी व ग्रामीण भागात रॅपिड ॲटिजेन टेस्ट मोहिम सुरु करण्यात आली. या मोहिमेतंर्गत पाचव्या दिवशी ३ हजार नागरिकांची रॅपिड ॲटिजेन टेस्ट करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

     तालुक्यात शहरी व ग्रामीण भागात रॅपिड ॲन्टीजेन टेस्टसाठी १२ पथके नेमण्यात आली असून,शहरी भागासाठी चार तर ग्रामीण भागा साठी आठ पथकामार्फत तपासणी करण्यात येत आहे. तपासणीसाठी विविध ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शहरातील निष्कर्ष , रोहन व निदान या खाजगी पॅथॉलॉजी लॅबच्या माध्यमातून तपासणी करण्यात येत आहे. तालुक्यात शहरी व ग्रामीण भागात घेण्यात येणाऱ्या ॲन्टीजेन टेस्टमुळे रुग्ण संख्येत काहीशी वाढ होताना दिसत असली तरी रुग्ण सापडणे हे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी फायदेशीर आहे. कोरोना आजार उपचाराने बरा होणारा आजार असल्याने या आजाराबाबत कोणीही भिती बाळगू नये असे, ही प्रांताधिकारी ढोले यांनी सांगितले.

समिती मार्फत लक्ष ठेवण्यात येणार

    कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील लक्षणे नसणाऱ्या व सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांचे समुपदेशन करुन गृह अलगीकरण करण्यात येणार आहे. त्यांना दिलेल्या आरोग्य विषयक सूचनांचे पालन करण्यासाठी शहरी भागात वार्डस्तरीय समिती व ग्रामीण भागात ग्रामस्तरीय समिती मार्फत लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे प्रांत सचिन ढोले यांनी सांगितले. 

        कोरोनाच्या वाढत्या रुग्णांवर वेळेत उपचार होण्यासाठी खाजगी रुग्णालयांनी आणखीन बेड उपलब्ध करुन द्यावेत. त्याचबरोबर वैद्यकीय सेवा वेळेत मिळवून देण्यास सर्व खाजगी रुग्णालयांनी आवश्यक माहिती डॅश बोर्डवर नोंदवावी अशा सूचनाही प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या. खासगी रुग्णालयांनी जास्तीत जास्त रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जन योजनेंतर्गत लाभ मिळवून द्यावा,असे आवाहनही प्रांताधिकारी ढोले यांनी केले आहे .
 
Top