समर्थ रामदास तालीम गणेशोत्सव तरुण मंडळाच्यावतीने भव्य रक्तदान शिबीर 

पंढरपूर,(प्रतिनिधी) -पंढरपूरमधील समर्थ रामदास तालीम गणेशोत्सव तरुण मंडळाच्यावतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते . रविवारी संपन्न झालेल्या या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

देशावर आलेले कोरोनाचे महाभयंकर संकट व पाच महिन्यापासून सुरु असलेल्या लॉकडाऊन मुळे देशात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे.हीच बाब लक्षात घेऊन सत्यविजय मोहोळकर यांच्या संकल्पनेतून श्री समर्थ रामदास तालीम ,दत्त घाट पंढरपूर यांच्यातर्फे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते .

येथील मुक्ताबाई मठामध्ये सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करून जवळपास ४० रक्त पिशवींचे संकलन करण्यात आले.रक्तदान केलेल्या प्रत्येक रक्तदात्यास मंडळाच्यावतीने एक हेल्मेट भेट म्हणून देण्यात आले.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्षा सौ. साधनाताई भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.याप्रसंगी उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव,सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र डांगे, ह.भ.प.अरूण बुरगाटे महाराज उपस्थित होते.

यावेळी सत्यविजय मोहोळकर यांनी आपले विचार मांडले. श्री समर्थ रामदास तालीम तरुण मंडळ हे पंढरपुरातील सर्वात जुन्या मंडळापैकी एक आहे.गेल्या अनेक वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम,त्याचबरोबर गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये विविध प्रकारचे प्रबोधनात्मक सजीव देखावे, महाराष्ट्राची लोकधारा असणारा भोंडला नागपंचमी उत्सव,पारंपारिक रितीरिवाजा प्रमाणे या मंडळामार्फत साजरा करणारे हे मंडळ एकमेव असल्याचे त्यांनी सांगितले.

नगराध्यक्षा सौ. साधना भोसले यांनी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम राबवून या मंडळाने देशसेवेचे काम केल्याचे सांगितले. आज रक्तदान करणार्‍या तरुणांची देशाला गरज असल्याचे सांगून रक्त दात्यांचे आभार मानले आणि मंडळाच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन गणेश लिंगडे सर यांनी केले.कार्यक्रमासाठी बापू कोरे, समाधान आधटराव,नितीन वाडेकर, गौस करमाळकर, विशाल आधटराव , गणेश मंगेडकर, योगेश लिगडे ,मंदार वैदय,शुभम वाडेकर,ओंकार वैदय, संतोष झवेरी, सचिन कोरे,भैया मोहोळकर यांनी अथक परिश्रम घेतले.
 
Top