पंढरपूर,(प्रतिनिधी)- कोल्हापूर विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.आनंदराव रामराव पाटील (वय ७७) यांचे  शनिवार (दि.१) रोजी रात्री १ वाजता हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. 

  शैक्षणिक क्षेत्राबरोबरच राजकीय व सामाजिक क्षेत्रातही त्यांनी भरीव काम केले होते.यशवंत विद्यालय भोसे (ता.पंढरपूर) या विद्यालायासाठी प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणात देणगी देत असत.भोसे परिसरात त्यांना मिरजेचे दादा या नावाने ओळखत असत. त्यांनी मिरज, कोल्हापूर व उस्मानाबाद येथे नोकरी केली.नोकरीच्या प्रत्येक ठिकाणी त्यांचा मोठा चाहता वर्ग होता. सेवा निवृत्तीनंतर त्यांनी पूर्णवेळ शेती विकसित करण्यासाठी दिला होता. 
त्यांचे पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगी असा परिवार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापु पाटील यांचे ते चुलते,भोसे सोसायटीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील व निवृत्त मंडल  कृषी अधिकारी शहाजीराव पाटील यांचे ते मोठे बंधू होते.
 
Top