इंडियन मेडिकल असोसिएशन व निमा संघटना यांच्या माध्यमातून उभारले कोविड हॉस्पिटल 

      पंढरपूर,(संभाजी वाघुले ),दि १६/०८/२०२० - कोरोना बाधित रुग्णांना वेळेत व योग्य उपचार मिळावेत यासाठी अकलूज येथे इंडियन मेडिकल असोसिएशन व निमा संघटना यांच्या माध्यमातून  उभारण्यात आलेले  कोविड हॉस्पिटल संपूर्ण राज्यासाठी आदर्श ठरेल असे,प्रतिपादन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

  इंडियन मेडिकल असोसिएशन व निमा संघटना यांच्या माध्यमातून  सुसज्ज कोविड हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. या हॉस्पिटलचे उद्घाटन पालकमंत्री दत्तात्रय भरणे , माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार राम सातपुते, उपसभापती अर्जुनसिंह मोहिते -पाटील, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, प्रांताधिकारी शमा पवार,तहसीलदार अभिजित पाटील,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भिमाशंकर जमादार,जिल्हाशल्यचित्सक डॉ.प्रदिप ढेले, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रामचंद्र मोहिते,डॉ.नितीन एकतपुरे,डॉ.एम.के.इनामदार उपस्थित होते.

       पालकमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, इंडियन मेडिकल असोसिएशन व निमा संघटनेच्या माध्यमा तून कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी  सुसज्ज व सोयीसुविधायुक्त १०० बेडचे कोविड हॉस्पिटल तयार करण्यात आले आहे. नागरिकांना येथे योग्य व चांगले उपचार मिळतील.हे कोविड हॉस्पिटल शासननिर्णयाच्या दरानुसार चालविण्यात येणार असल्याने सर्वसामन्य नागरिकांनीही याचा चांगला उपयोग होईल.  सर्व संस्था व संघटना  सामाजिक बांधलिकी ठेवून काम करत आहेत.  अकलूज येथील कोविड हॉस्पिटलसाठी लागणारे आवश्यक ते सहकार्य शासनाच्यावतीने करण्यात येईल.

       जिल्हातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी  जिल्हा प्रशासन व संबधित यंत्रणा समन्वायाने काम करीत आहे. कोरोना बाधित रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी अकलूज येथील सर्व खाजगी डॉक्टरांच्या माध्यमातून डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल सुरु केले आहे. या हॉस्पिटलमध्ये रुग्ण सेवा यांच्यामार्फतच केली जाणार आहे.या हॉस्पिटलमुळे तालुक्यातील तसेच परिसरातील नागरिकांना उपचारासाठी फायदा होणार आहे. रुग्णावरील उपचाराचे दर हे शासन निर्णयानुसारच आकारण्यात येणार आहेत. तसेच हे कोविड हॉस्पिटल महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट करण्याबाबत कार्यवाही करावी, असे श्री. शंभरकर यांनी सांगितले.  

  
  या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना उपचाराबरोबरच त्यांचे समुपदेशन करण्यात येवून त्यांचे मनोबल वाढविण्यात येणार आहे.या हॉसिपटलचा अकलूज व परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार असल्याचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले.

        इंडियन मेडिकल असोसिएशन व निमा संघटनेशी संबंधित १५० खाजगी डॉक्टरांनी  एकत्रित येवून येथे २० बेड व्हेंटिलेटर व ८० बेड ऑक्सिजन सुविधा असणारे बनविण्यात आले आहे. हे हॉस्पिटल शासनाच्या नियमानुसार व दर प्रणालीनुसार चालविण्यात येणार  असून, रुग्णांना सर्व  सेवा संघटनेमार्फत देण्यात येणार असल्याचे  इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. नितीन एकतपुरे यांनी सांगितले.

     यावेळी प्रांताधिकारी शमा पवार यांनी माळशिरस तालुक्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्या साठी प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या उपाय योजनेची माहिती दिली.शासनाच्यावतीने एक हजार पीपीई किट आणि मास्कचे वाटप पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
 
Top