जिल्ह्यात ६८.४१ टक्के पीककर्ज वाटप 

   सोलापूर, दि.०४/०८/२०२०- सोलापूर जिल्ह्यात ६८.४१ टक्के पीककर्ज वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली. जिल्ह्यासाठी खरीप हंगामात १४३८ कोटी ५५ लाख रुपयांचे उद्दिष्टये होते त्यापैकी ९८४ कोटी १५ लाख पीककर्ज वाटप झाले आहे. एकूण ६६,१५१ खातेदारांना हे वाटप झाले असल्याची माहिती श्री.शंभरकर यांनी दिली.

जिल्ह्यात ३ ऑगस्टपर्यंत ३२२.९ मिमि पाऊस

      श्री. शंभरकर यांनी सांगितले की,‘ जिल्ह्यात १ जून ते ३ ऑगस्ट २०२० पर्यंत ३२२.९ मिलिमिटर पाऊस झाला. हा सरासरीच्या तुलनेत १५५.५ टक्के पाऊस आहे. जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये ३ लाख ५९ हजार २९४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. चांगल्या पावसामुळे सरासरीच्या १५३ टक्के पेरणी झाली आहे.’

     प्रधानमंत्री पीकविमा योजनेत २ लाख ६८ हजार ५४२ शेतकऱ्यांनी सहभाग नोदविला. जिल्ह्यातील एकूण संरक्षित रक्कम ५०१.८२ कोटी रुपये असून यामध्ये शेतकऱ्यांचा हिस्सा १०.२७ कोटी रुपयांचा आहे.सर्वात जास्त बार्शी तालुक्यातील १ लाख १८ हजार ३१८ शेतकऱ्यांचा प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले.

सोयाबीन बियाणे उगवणी संदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बियाणे उगवणीसंदर्भात सात तालुक्यातून ५१० तक्रारी प्राप्त झाल्या. तक्रार निवारण समितीने ४५५ तक्रारींची प्रत्यक्ष पाहणी केली असता १९१ तक्रारींमध्ये बियाणात दोष आढळून आला. त्यापैकी शेतकऱ्यांना ६ क्विंटल बियाणे बदलून दिले. ५२ शेतकऱ्यांना २ लाख ३५ हजार १३५ रुपये कंपनीमार्फत नुकसान भरपाई देण्यात आली. निकृष्ठ बियाणासंदर्भात ग्रीन गोल्ड कंपनीवर वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाबीज, यशोदा सिड्स व दप्तरी सिड्स कंपन्यांवर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. बनावट व निकृष्ठ खताबाबत करमाळा पोलीस ठाण्यात दोन तर मोहोळ पोलीस ठाण्यात १ गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

    यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे आदी उपस्थित होते.
 
Top