पंढरपूर शहरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरु


  शेळवे (संभाजी वाघुले),दि.०७/०८/२०२० -  पंढरपूर शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी  जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी सात दिवस संचारबंदीचे आदेश पारीत केले आहेत.शहरात पहिल्याच दिवसांपासून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरु असून जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांनी दिली.


  पंढरपुरातील नागरिकांनीही घरातच थांबून संचारबंदीच्या आजच्या पहिल्या दिवशी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.


 पंढरपूर तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून, संचारबंदीची कडक अंमलबजावणीसाठी शहरात १३७ पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच २५० कोरोना वॉरियर्सचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. शहरात सात दिवसांच्या संचारबंदी कालावधीत दूध, हॉस्पिटल व मेडीकल या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. कोणीही विनाकारण फिरताना आढळून आल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन व साथरोग प्रतिबंध कायद्यांतर्गत कडक कारवाई  करण्यात येईल, असेही डॉ.कवडे यांनी सांगितले.

शहर पोलिसांनी कारवाई करत १५५ केसेस केल्या 

    पंढरपूर शहर पोलिसांनी कारवाई करत १५५ केसेस केल्या असून ३६ हजार ३०० रुपये इतका दंड वसूल केला आहे. यामध्ये ६८/६९ प्रमाणे कारवाई करत ११२ जणांवर केस दाखल केल्या आहेत यात मास्क न वापरणे ४३ केस असून ४३०० रुपये दंड करण्यात आला आहे, तीन चारचाकी वाहनांवर कारवाई करत पंधराशे रुपये दंड केला आहे. दोन दुकानांवर वेळेपेक्षा जास्त वेळ दुकान उघडे ठेवल्यामुळे दोन हजार रुपये दंड करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या दोघांवर कारवाई करत चारशे रुपये दंड वसूल करण्यात आला आहे . मोटार वाहन कायद्या प्रमाणे १०५ जणांवर कारवाई  करत २८ हजार शंभर रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.


दिलेल्या आदेशाचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरात रॅपिड ॲटीजेन टेस्टची मोहीम सुरु असून नागरिकांनी आरोग्य तपासणी करुन घ्यावी. तसेच प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही  त्यांनी केले आहे.
 तालुक्यातील टाकळी येथे काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून आली. टाकळी हा परिसर पंढरपूर शहराला लागून असल्यामुळे येथेही मोठ्या प्रमाणात रॅपिड ॲटिजेन टेस्टची सुरुवात केली आहे. तालुक्यात आज एका दिवसात विविध गावांमध्ये ५०० रॅपिड ॲटिजेन टेस्ट करण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी दिली.


    रॅपिड ॲटिजेन टेस्टमुळे रुग्ण संख्येत काहीशी वाढ होताना दिसत असली तरी नागरिकांनी चिंतीत होऊ नये. रुग्ण सापडणे हे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी फायदेशीर आहे हे लक्षात घेवून रुग्ण शोध मोहीम प्रभावीपणे राबविण्यावर आणि कोरोनाची साखळी तोडण्यास अधिकाधिक भर देण्यात येणार असल्याचे श्री. घोडके यांनी  सांगितले.
 
Top