१ ऑगस्ट १९९८ शहीद निलेश तुणतुणे - THE BIGINING OF KARGIL WAR 

        मान्सून तुफान सुरु झाला होता. धुवांधार बर्फवृष्टी सुरु होती. हवेत कडाक्याचा गारवा पसरलेला होता. डोंगरमाथे स्वतःभोवती शुभ्र धुक्याची झालर लपेटून बोचऱ्या थंडीचा आस्वाद घेत होते. रंगबिरंगी फुलांनी नटलेली धरणी हिरवागार शालू नेसून त्यावर धवल रंगाची शाल पांघरून निसर्गाच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. नितळ पाण्याचे खळाळते नदी-नाले जणू मावळत्या सूर्याच वंदन गीत गात होते. तसं जम्मू काश्मीर म्हणजे स्वर्गच जणू मग तिथे ऋतू कोणता का असेनात.
  
         बर्फवृष्टीने डोळ्यासमोर एक सफेद पडदा उभा राहिला होता. अंधार वाढत चालला होता. भारतीय सेना आपल्या पोस्ट/चौक्यांवर कडा पहारा देत जिद्दीने उभी होती. ग्रेनेडीयर्स रेजिमेंटची एक तुकडी श्रीनगरच्या बारामुल्ला पोस्टवर तैनात होती. आमच्या अलिबाग तालुक्याची शान गनमास्टर निलेश तुणतुणे सीमा रक्षणार्थ खडा पहारा देत होता. यापूर्वी सन १९४७, १९६५ आणि १९७१ मध्ये पाक सैन्याला भारतीय सैन्याने जबरदस्त तडाखा दिला होता. त्या पराभवाने जळत असलेल्या पाकच्या कागाळ्या अधूनमधून चालतच होत्या.
    
         कारगील, द्रास व मश्को खोऱ्यातील भारतीय चौक्या अतिउंचीवर आहेत. तिथे मान्सून म्हणजे बर्फवृष्टी तर हिवाळा अतिशय कडक असतो व तापमान अक्षरशः उणे(मायनस) ४० अंश सेल्सियस पर्यंतही खाली उतरू शकते. त्यामुळे अतिउंचावरील चौक्यांवर कडक हिवाळ्याच्या महिन्यांत सैन्य तैनात करून ठेवणे अतिशय अवघड असल्याने, मान्सूनपूर्वीपासून हिवाळ्याच्या शेवटापर्यंत दोन्ही बाजूच्या सैन्याने उंचीच्या ठिकाणावरच्या आपापल्या चौक्या सोडून आपापल्या हद्दीत डोंगर पायथ्याशी थांबावे आणि उन्हाळ्यात बर्फ वितळल्यावर व हवामान मानवी रहाणीमानास स्थिर झाल्यानंतर, जे ते सैन्य आपापल्या चौक्यांमध्ये परतावे, असा अलिखित समझौता भारत-पाकिस्तान मध्ये रीत-रिवाज असल्याप्रमाणे सुरु होता.

          हिवाळ्यात भारतीय सैन्य आपल्या चौक्या सोडून खाली उतरलं होत. नेमका याच संधीचा फायदा घ्यायचा आणि भारतीय चौक्यावर ताबा मिळवायचा असा शकुनीप्रयत्न पाकिस्तान सेना प्रमुख जनरल मुशर्रफ यांनी चालवला. त्यासाठी ठिकाण निवडल गेल कारगील.! कारगील हे लहान शहर असून जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगर पासून २०५ किलोमीटर अंतरावर आहे. राष्ट्रीय महामार्ग लेह ते श्रीनगर या रस्त्यावर कारगील वसलेले आहे. एकदा का कारगिल ताब्यात आल की राष्ट्रीय महामार्ग १ अ तोफांच्या टप्प्यात येणार होता. अन तोफांच्या टप्प्यात येणारा मार्ग म्हणजे भारतीय सेनेची रसद तोडण्याचा प्रभावी मार्ग हा अतिशय भयंकर डाव नवाज शरीफ अन मुशर्र्फ या दुकलीने आखला होता. या कारवाईला "ऑपरेशन बद्र" असे नाव देण्यात आले.

          काळोख्या रात्रीत "हिजबुल  मुजाहिदीन" नावाच्या अतिरेकी संघटनेच्या नावाखाली पाकिस्तानी सैन्य भारतीय चौक्यांकडे निघाल. बारामुल्ला पोस्टवर गनमास्टर निलेश तुणतुणे आणि त्याच्या सहकारी जवानांची एक तुकडी त्या भयंकर गारठ्यात पहारा देत असतानाच पाक सैन्याकडून तोफांचा मारा सुरु झाला. भारतीय लष्कराला या चकमकीत गुंतवून ठेवून हिजबुल  मुजाहिदीनच्या वेशात पाक सैन्याने भारतीय चौक्या ताब्यात घ्यायचा अस कुटील कारस्थान जिव धरत होत. 

          पाक बाजूने सुरु झालेल्या तोफ हल्ल्याला प्रतिउत्तर म्हणून भारतीय सैन्याने देखील आपल्या तोफांची तोंड उघडली. गनमास्टर निलेश अन त्याचे सहकारी जवान पाकला तोडीस तोड जबाब देत होते. दोन्ही बाजूने भयंकर तोफांचा मारा सुरू होता. अन त्यातल्याच एका तोफेच्या गोळ्याच्या टप्प्यात निलेश तुणतुणे सापडला. आग ओकणार एक तोफेचा गोळा पाकच्या बाजूने निघाला तो थेट निलेश जवळ येऊन पडला. भारतीय सीमेच्या रक्षणार्थ निधड्या छातीने उभा असलेला निलेश धारातीर्थी पडला. देशाच्या रखवालीसाठी त्यान आपला जिव या मातृभूमीवर ओवाळून टाकला. 
    
          तोफांच्या चकमक युद्धात भारतीय सैन्याला गुंतवून ठेवून दुसऱ्या बाजूला पाक सैन्य भारतीय सैन्याच्या रिकाम्या चौक्यांकडे पुढे सरकत होत. देशा-खातर उमद्या वयातील निलेशच उसळत रक्त सीमेवर सांडल होत. नव्हे नव्हे भारत भूमीलाच जणू बिलगल होत. आजही तिथली माती निलेशच्या बलिदानाची साक्ष देत भारतीय जवानांसाठी स्फूर्तीगीत गात आहे. त्या वीर योध्याच्या शौर्याचा गंध अजूनही त्या हवेत दरवळत आहे. शहीद गनमास्टर निलेशच रणांगणात धारातीर्थी पडलेलं कलेवर म्हणजे जणू काही १९९९ च्या कारगील युद्धाची नांदी होती. कारगील युद्धारंभाचा शंखनादच केवळ बाकी उरला होता.

          अलिबाग तालुक्यातील सहाणगोठी गावचा हा वीर सुपुत्र मातृभूमीसाठी शहीद झाला. संपूर्ण सहाणगोठी गावावर शोककळा पसरली. निर्मला नारायण तुणतुणे या माउलींन पोटचा गोळा सबंध देशावर ओवाळून टाकला होता. अलिबाग तालुक्याच नाव आणखी एकदा अभिमानाने घेतल जाणार होत. शहिदांच्या यादीत निलेश तुणतुणे नावाच्या योध्याच नाव सुवर्णाक्षरांनी सामील झाल. शहीद निलेश तुणतुणेच्या रूपाने एक नवा क्रांतिसूर्य अलिबागकरांच्या ताठ मानेला बळकटी देत होता. आजही शहीद निलेशच स्मारक कारगील युद्धात प्राण अर्पिणाऱ्या जवानांच्या हौतात्म्याची साक्ष देत सहाणगोठी गावची पुण्याई सांगत तुम्हा आम्हासाठी प्रेरणास्थान म्हणून उभ आहे.
 
Top