श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर दि.३१/०८/ २०२० पर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद

पंढरपूर,दि ३१/०७/२०२० - कोरोना व्हायरस (कोविड १९) चा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढला आहे. हा व्हायरस तीव्र संसर्गजन्य स्वरूपाचा असलेने महाराष्ट्र राज्यामध्ये दिवसें दिवस रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे तातडीने खबरदारीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याने, भाविकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर दि.१७/०३/२०२० ते दि.३१/०७/२०२० या कालावधीत भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आलेले आहे.

श्रीचे नित्योपचार अत्यंत काटेकोरपणे पाळणार

     तथापि, राज्य शासनाने दि.३१/०८/२०२० पर्यंत संपूर्ण राज्यात लॉकडाऊन वाढविला आहे. तसेच महाराष्ट्र राज्यात तसेच आपल्या सोलापूर जिल्हयात व पंढरपूर शहरात देखिल मोठया प्रमाणात कोरोना रूग्ण आढळून आलेले आहेत. राज्य शासनाने राज्यातील सर्व धार्मिक स्थळे दि.३१/०८/२०२० पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व बाबी विचारात घेता, मंदिरे समितीने श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर दि.३१/०८/ २०२० पर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर हे महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील लाखो भाविकांच्या भावनेशी संबंधित आहेत. त्यामुळे श्रीचे नित्योपचार अत्यंत काटेकोरपणे, वेळच्या वेळी, हजारो वर्षाचे प्रथा व परंपरांची सांगड घालून करणे आवश्यक आहे. कामातील त्रुटींमुळे भाविकांच्या श्रध्देला तडा जाणार नाही यासाठी पुरेपर दक्षता घेणे आवश्यक आहे. तसेच वारकरी सांप्रदयाचे श्रींच्या नित्योपचारांबरोबर अन्य प्रथा परंपंरा यावर कटाक्षाने लक्ष्य असते ही बाब विचारात घेता, पहाटे होणारी श्रीची काकडा आरती, नित्यपुजा, महानैवेद्य, पोशाख, धुपारती व शेजारती इथेपर्यंतचे सर्व उपचार पुजा परंपरेनुसार जो पूजोपचार बजावण्यात येत आहे. त्याच्या स्वरूपात किंवा तिच्या पध्दतीत कोणत्याही प्रकारचे खंड न पाडता किंवा व्यत्यय न आणता मंदिरात नित्य म्हणजेच दैनंदिन पूजोपचार चालू ठेवण्यात येत आहेत. तसेच इतर सणवार, उत्सव परंपरेनुसार साध्या पध्दतीने साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे.


     सदरचे पत्रक श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरचे सदस्य आ.रामचंद्र कदम, श्रीमती शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, भास्करगिरी गुरू किसनगिरी बाबा, संभाजी शिंदे, आ.सुजितसिंह ठाकूर, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर),ॲड.माधवी निगडे, ह.भ.प.प्रकाश जवंजाळ, भागवतभुषण अतुलशास्त्री भगरे गुरूजी, ह.भ.प.शिवाजीराव मोरे, नगराध्यक्षा सौ. साधना भोसले यांचेशी विचारविनियम करून एकमताने निर्णय घेतल्यानंतर सह अध्यक्ष गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी प्रसिध्दीस दिले आहे.   
 
Top