खत टंचाई दूर करा,गाईच्या दुधाला ३० रु.दर द्या,अवैध वाळू उपसा रोखा,बनावट दारू विक्रीवर कारवाई करा 

एकीकडे कोरोनामुळे शेतकरी अडचणीत आलेला
असताना शेतकऱ्यांना युरिया खताची चढ्या दराने अथवा काळ्या बाजारात खरेदी करावी लागत असून खताची टंचाई निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांसमोर ऐन हंगामात मोठे संकट उभा राहिले आहे. अशातच सहकारी व खाजगी दूध संकलक दूध दराबाबत दूधउत्पादकांची गळचेपी करत असून गाईच्या दुधाला ३० रुपये प्रतिलिटर दर मिळणे गरजेचे आहे. तालुक्यात अनेक बँका शेतकऱ्यांना पीक कर्जे देण्यास टाळाटाळ करीत असून अशा बँकांवर कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना त्वरित पीक कर्जे उपलब्ध केली जावीत.

         बेसुमार वाळूचा उपसा बंद करावा

माढा मतदार संघाला जोडल्या गेलेल्या ४२ गावांपैकी नदी काठच्या गावातून सुरु असलेला बेसुमार वाळूचा उपसा बंद करावा अशीही मागणी पंढरपूर तालुका शिवसेनेने प्रांताधिकऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे . बनावट दारू विक्री करून लोकांच्या जीवाशी खेळायचा प्रकार होत असून याबाबत कठोर कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन पंढरपूर तालुका शिवसेनेच्यावतीने आज पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांना देण्यात आले. 

      या निवेदनाच्या प्रति राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,राज्याचे कृषिमंत्री,दुग्धविकास मंत्री, गृहमंत्री, जिल्हाधिकारी,उपविभागीय पोलीस अधिकारी यांना पाठविण्यात आल्या आहेत. 

      यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख महावीर देशमुख, उपशहर प्रमुख तानाजी मोरे,उपशहर प्रमुख लंकेश बुराडे आदी उपस्थित होते.   
 
Top