सिव्हिल हॉस्पिटलमधील कोरोना वॉर्डचे लोकार्पण

   शेळवे ,(संभाजी वाघुले) - श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या (सिव्हिल हॉस्पिटल) येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या कोरोना वॉर्डचे आज लोकार्पण करण्यात  आले. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी  या वॉर्ड मधून जास्तीत जास्त गरीब रुग्णांची सेवा व्हावी. येथून जास्तीत जास्त रुग्ण कोरोनामुक्त व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

     यावेळी आमदार प्रणितीताई शिंदे,आमदार यशवंत माने, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महानगरपालिका आयुक्त पि. शिवशंकर, अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर आदी उपस्थित होते

 सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नव्याने झालेल्या या वॉर्डमुळे  शहरातील गरीब आणि गरजू रुग्णांवर तत्काळ उपचार होतील त्यामुळे शहराचा मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल. या वॉर्डमध्ये सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सेवा येत्या दोन तिन दिवसात दिल्या जातील. त्याअनुषगांने जिल्हा प्रशासनाने कामकाज करावे, अशा सूचनाही पालकमंत्री भरणे यांनी दिल्या.

वीस बेडचा आयसीयू कक्ष विकसित

  सिव्हिल हॉस्पिटलच्या बी ब्लॉक इमारतीतील तळ मजल्या वर हा वॉर्ड विकसित करण्यात आला आहे. यासाठी निकषा नुसार स्वतंत्र एंट्री आणि एक्झिटची व्यवस्था करण्यात आली आहे. तळमजल्यावर चाळीस बेडची क्षमता असलेले दोन वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. येथे ऐंशी रुग्णांची व्यवस्था होऊ शकते. वीस बेडचा आयसीयू कक्ष विकसित करण्यात आला आहे. हे सर्व कक्ष अत्याधुनिक सेवेने युक्त आहेत, असे अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर यांनी सांगितले.

 सिव्हिल हॉस्पिटलमधील सी ब्लॉक मधील २२ रुम्स कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी विकसित करण्यात आल्या आहेत. प्रत्येक रुममध्ये स्वतंत्र टॉयलेट-बाथरुमची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे ४० रुग्णांची व्यवस्था होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.
 
Top