अश्‍लीलता, तसेच हिंसक दृष्ये यांचा मारा करणार्‍या ‘वेब सिरिज’ना गेल्या २ वर्षांत भारतात उधाण आले आहे. नैतिक मूल्यांचा र्‍हास करण्यासह अनेक ‘वेब सिरिज’मधून भारतीय सैनिकांविषयी गलिच्छ दृष्य दाखवण्यात आली आहेत. ‘इंटरनेट क्रांती’ झाल्यापासून भारतात स्वस्त आणि वेगवान इंटरनेट सर्व्हिस उपलब्ध झाली. ‘ओव्हर द टॉप’ (ओटीटी) स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून सामाजिक, नैतिक आणि राष्ट्रीय मूल्यांना पायदळी तुडवले जात आहेत. या माध्यमांवर कोणत्या प्रकारची दृष्ये दाखवली जावीत, याला काही कोणतेही बंधन नाही कि त्यावर कोणाचे नियंत्रण नाही. ‘वेब सिरिज’च्या माध्यमातून चाललेला धुडगूस वेळीच रोखला नाही, तर प्रेक्षकांचे मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक आणि राष्ट्रीय अधःपतन होईल. हे होऊ द्यायचे नसेल, तर ‘वेब सिरिज’वर ‘सेन्सॉरशिप’ आणणे, आवश्यक आहे. 
*‘वेब सिरिज’चा नंगानाच !*
       वेब सिरिज’मधून अत्यंत आक्षेपार्ह, अश्‍लील, देशविरोधी दृष्ये-संवाद प्रसारित केली जात आहेत. मनोरंजनाच्या नावाखाली व्यक्तीच्या राष्ट्रीय आणि धार्मिक संवेदना बोथट करण्याचा प्रकार घडत आहे. भारतीय युवकांना पथभ्रष्ट करण्याचा हा डाव आहे.भारत सरकारने याची गंभीर नोंद घेऊन ‘वेब सिरिज’च्या नावे चाललेला नंगानाच बंद करायला हवा. त्यासाठी ‘सेन्सॉर बोर्डा’सारखे प्राधिकरण स्थापन करून कुठल्या प्रकारचे दृष्य-संवाद प्रसारित केले जावेत आणि जाऊ नयेत, याची बंधने आखून द्यावीत. या ‘सेन्सॉर बोर्डा’मध्ये सांस्कृतिक क्षेत्रातील तज्ञांचीही नियुक्ती केली जावी.
मनुष्य आणि अन्य प्राणी यांतील भेद
‘आहार निद्रा भय मैथुनं च । सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम् ॥
धर्मो हि तेषामधिको विशेषः । धर्मेण हीनाः पशुभिः समानाः ॥’, 

असे संस्कृत सुभाषित आहे. याचा अर्थ ‘आहार, निद्रा, भय आणि मैथुन या गोष्टी मनुष्य आणि अन्य प्राण्यांमध्ये सारख्या आहेत. मनुष्याकडे पशूंपेक्षा वेगळी असलेली गोष्ट म्हणजे केवळ ‘धर्म’ आहे. धर्मविहीन लोक हे पशूतुल्यच आहेत.’  आज दुर्दैवाने मनुष्याला प्राण्यांपेक्षा वरचे स्थान देणारा ‘धर्म’च वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात उणावत चालला आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग करून समाजावर सकारात्मक आणि प्रेरणादायी सूत्रे बिंबवायला हवीत; पण ‘वेब सिरिज’च्या माध्यमातून अश्‍लील आणि हिंसक दृष्यांचाच भडिमार होत आहे. ‘द्रष्टा दृष्यवशात् बद्ध:’ म्हणजे दृष्य पहाणारा त्या दृष्यांच्या बंधनात अडकतो, असे म्हणतात. त्या दृष्टीने पहायला गेले, तर ‘वेब सिरिज’च्या माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली समाजाचे अधःपतनच होत आहे, असे म्हणावे लागेल. 

*आत्मनिर्भरते पुढचा अडथळा*

        काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारता’चा नारा दिला होता. हे सूत्र केवळ आर्थिक विषयांशी निगडित नाही, तर त्याला सांस्कृतिक पदरही आहे. संस्कृती आणि राष्ट्रभक्ती हा आत्मनिर्भरतेचा पाया आहे. ‘वेब सीरिज’च्या माध्यमातून तो डळमळीत होत आहे. त्यामुळे ‘आत्मनिर्भरते’पुढे अडथळा ठरणार्‍या ‘वेब सीरिज’ आणि ‘ऑनलाईन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स’वर सरकारने निर्बंध घालावेत, ही अपेक्षा !  


चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था
संपर्क : 7775858387


 
Top