पंढरपूर शहरातील सर्व बँका व इतर शासकीय कार्यालयातील सोलापूरहून येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना ३० जूनपर्यंत पंढरपूर शहरात रहाणे बंधनकारक
पंढरपूर शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव  व संसर्ग रोखण्यासाठी व नियंत्रणासाठी आज पंढरपूर शहरातील सर्व बँक शाखा प्रमुख व इतर कार्यालयाच्या प्रमुखांची बैठक पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर , उप - मुख्याधिकारी सुनिल वाळूजकर, बँक को ऑर्डीनेटर योगेश काळे यांचे उपस्थितीत  संपन्न झाली.

 पंढरपूर शहरामध्ये असलेल्या सर्व बँकांमध्ये व इतर शासकीय कार्यालयात व इतर कार्यालयात  बाहेरगावाहून विशेषतः सोलापूरहून काही कर्मचारी कामासाठी येत आहेत किंवा जाऊन येवून काम करीत आहेत अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.सध्या सोलापूरमध्ये कोरोना विषाणू वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील नागरिक अथवा बँकेत काम करणारे कर्मचार्‍यांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व संसर्ग होऊ नये यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. याबाबत इंसिडेंट कमांडर तथा उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी शहरातील बँकांना नोटीस बजावण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार नगरपरिषदेने शहरातील सर्व बँकांना व इतर कार्यालयांना नोटीस बजावल्या होत्या. आज सर्व बँकेचे शाखा प्रमुख व इतर शासकीय कार्यालयातील प्रमुखांची बैठक नगरपरिषद सभागृहात  संपन्न झाली. 

  या बैठकीमध्ये मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी बँकेत येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची नोंद रजिस्टरला घ्यावी व त्यांचे थर्मल स्क्रीमींग करण्यात यावे. एखाद्या ग्राहकांला ताप असेल तर त्वरित नगरपरिषदेशी संपर्क साधावा .तसेच सर्व बँकेचे शाखाप्रमुख, इतर कार्यालयांनी आपल्या बँकेत व कार्यालयात सोलापूरहून अथवा इतर गांवावरून किती कर्मचारी दररोज ये जा करतात  याची माहिती नगरपरिषदेला त्वरित द्यावी . कार्यालयातील अथवा बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांचे पल्स ऑक्झिमीटरद्वारे तपासणी करण्यात यावी. सर्व एटीएमचे वेळोवेळी सॅनिटायझेशन करण्यात यावे .येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचे हातावर सॅनिटीझर मारूनच बँकेत प्रवेश द्यावा, कर्मचारी व ग्राहक यांनी  मास्क वापरलाच पाहिजे तसेच सोशल डिस्टन्स राखला जाईल याची दक्षता घ्यावी . बाहेर गांवावरून येणारा कर्मचारी हा मुख्य कार्यालयाचे ठिकाणीच राहिला पाहिजे तो कोणत्याही परिस्थितीत बाहेर गावाहून ये जा करणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी सम्बधित कार्यालय प्रमुख याची राहील. जर एखादा कर्मचारी  सूचना देऊनही असा बाहेर गांवी ये जा करत असल्याचे निदर्शनास आल्यास किंवा त्या बाबत तक्रार आल्यास त्यांचेवर व कार्यालय प्रमुखावर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल. अशा प्रकारच्या सक्त सूचना या बैठकीत देण्यात आल्या.

  या बैठकीस शहरातील सर्व बँक शाखा प्रमुख व इतर कार्यलय प्रमुख हजर होते.
 
Top