पंढरपूर - यंदा राज्यातील सर्वात मोठी असणारी पंढरपूरची आषाढी यात्रा भरणार नसल्यामुळे येथील यात्रेवर अवलंबून असणारी हजारो कुटूंबे आर्थिक अडचणीत सापडलेली आहेत. त्यातच व्यवसाय ही बंद असल्यामुळे दुकानात काम करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करणारे कामगारही घरी बसून आहेत. कामच बंद असल्या मुळे घरी खायचे काय असा प्रश्न त्यांच्या कुटूंबा समोर उभा राहिलेला आहे. पंढरपूरचे अर्थकारण प्रामुख्याने श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या मंदिरा वरच अवलंबून आहे. वर्षात भरणाऱ्या आषाढी, कार्तिकी, चैत्री व माघी या चार यात्रांवर अर्थकारण आजपर्यंत चालत आलेले आहे. या चार यात्रांमधून मिळणाऱ्या मिळकतीमधूनच अनेक कुटूंबाचे वर्षाचे नियोजन ठरलेले असते. त्यामुळे ज्याप्रमाणे कोकणातील नागरिकांना नुकसान भरपाई देण्यात आली त्याच धर्तीवर पंढरपुरातील यात्रेवर अवलंबून असलेल्या व्यापारी व कामगार वर्गाला आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी पंढरपूर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष विक्रमराजे कदम यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. 

   या निवेदनात असे म्हटले आहे की, यंदा चैत्री व आषाढी यात्रा भरलेली नसल्यामुळे येथील अनेक यात्रेवर अवलंबून असणारे प्रासादिक साहित्य, कुंकू-बुक्का, पेढेवाले, हारवाले, श्रींचे फोटो विकणारे, तुळशीच्या माळा विकणारे, चुडा, बांगड्या विकणारे, नाम लावणारे, टांगा, रिक्षा चालक यासह यात्रेवर अवलंबून असणारी अनेक  कुटूंबे आर्थिक अडचणीत सापडलेली आहेत. आधीच कोरोनामुळे गेल्या ३ महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे व आता आषाढी यात्राच भरणार नसल्यामुळे आत आणखी भर पडलेली आहे याचा शासनाने विचार करून ज्या पध्दतीने आपण कोकणामध्ये चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीनंतर तेथील नागरिकांना महाविकास आघाडीच्या सरकारने कोट्यावधी रूपयांची आर्थिक मदत दिली त्याच धर्तीवर शासकीय यंत्रणेमार्फत योग्य तो सर्व्हे करून पंढरपूर शहरातील यात्रेवर अवलंबून असणाऱ्यांना कुटूंबास आर्थिक मदत करण्यात यावी व त्यांना दिलासा देताना महाविकास आघाडीचे सरकार हे आपलं सर्वसामान्यांचे सरकार असल्याची भावना निर्माण झाली पाहिजे. तरी वरील निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा. या निवेदनाच्या प्रति माहिती व कार्यवाहीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पुणे विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांना पाठविण्यात आल्या आहेत.
 
Top