अलिबाग , जि.रायगड , दि.०६/०६/२०२०, (जिमाका) - जिल्ह्याच्या बाहेरून निवासासाठी येणाऱ्या नागरिकांनी संबंधित राज्य शासन, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांची पूर्वपरवानगी घेऊन रायगड जिल्ह्यात येणे आवश्यक आहे तसेच संबंधित जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांनी घोषित केलेल्या कराेनाबाधित (कंटेनमेंट झोन) प्रतिबंधात्मक क्षेत्रांमधून नागरिकांना ये-जा करण्यास प्रतिबंध राहील.

       तसेच रायगड जिल्ह्यातील जे नागरिक निवासासाठी येत नसून शेतीच्या कामासाठी, घराच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी,खासगी शासकीय कार्यालयांमध्ये रुजू होण्यासाठी, कंपनीच्या कामासाठी, वैद्यकीय उपचारांसाठी, औषध घेण्यासाठी, लग्न,मृत्यू इत्यादी कार्यासाठी  येणाऱ्या नागरिकांना हाेमक्वारंटाईन किंवा संस्थात्मक क्वारंटाईन करण्याची आवश्यकता नाही. 

     तथापि अशा व्यक्तींमध्ये काेविड-१९ ची लक्षणे आढळल्यास त्यांनी तात्काळ उपचारासाठी दवाखान्यात दाखल हाेणे आवश्यक आहे.
       
     जिल्ह्यामध्ये अधिक काळ रहिवासासाठी येणाऱ्या नागरिकांना १४ दिवस आवश्यकतेनुसार घरामध्ये किंवा संस्थात्मक विलगीकरण करणे आवश्यक आहे तसेच संबंधित नागरिकांची काेविड-१९ बाबतची प्राथमिक तपासणी करण्यात यावी. यामध्ये जर संबंधित व्यक्तीला कोविड-१९ ची लक्षणे आढळली तर त्या व्यक्तीला तात्काळ शासकीय दवाखान्यामध्ये दाखल करावे. मात्र काेविड-१९ ची लक्षणे नसल्यास त्या व्यक्तीने हाेमक्वारंटाईन व्हावे.    

       भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार काेविड- १९ बाधित रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना १४ दिवस क्वारंटाईन हाेणे आवश्यक आहे. काेविड -१९ बाधित व्यक्तीला रूग्णालयामधून डिस्चार्ज दिल्यानंतर सात दिवस होम क्वारंटाईन करावे, काेविड-१९ बाधित रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या हाय व लो रिस्कमधील व्यक्तीला भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार क्वारंटाईन करणे आवश्यक राहील तसेच परदेशातून येणाऱ्या नागरिकांना सात दिवस हॉटेल वा संस्थात्मक क्वारंटाईन आणि वैद्यकीय काेविड तपासणी निगेटिव्ह आल्यास सात दिवस होमक्वारंटाईन करणे आवश्यक राहील. 

      या व्यतिरिक्त शासनाने काेविड-१९ बाबत प्रतिबंधात्मक उपाययाेजनांकरिता वेळोवेळी दिलेल्या सूचना बंधनकारक राहतील,असेही जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
 
Top